‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य सरदेशपांडेची फटाकेबाजांना चपराक; नरकात पाठवण्याची मजेशीर दिली धमकी!
दिवाळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतोय. रंगीबेरंगी रांगोळ्या, चमचमणारी दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांचा धमाका यामुळे सगळीकडे उत्सवाचं वातावरण आहे. पण काही लोक रात्री उशिरापर्यंत फटाके फोडून इतरांना त्रास देतात. असाच अनुभव मराठी टेलिव्हिजनवरील ‘ठरलं तर मग’ (Tharla Tar mag ) या मालिकेतील अभिनेता चैतन्य सरदेशपांडेला (Chaitanya Sardeshpande) आला. त्याने यावर सोशल मीडियावर एक मजेदार पण तिखट व्हिडीओ शेअर करत रात्री अडीच वाजता फटाके फोडणाऱ्यांना खड्ड्यात घेतलं आहे.
चैतन्यने आपल्या व्हिडीओत राग आणि विनोदाचं मिश्रण करत सांगितलं, “दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा! पण रात्री अडीच वाजता कोण फटाके फोडतं? ही कोणाची पहाट आहे? तुला उठायचं असेल तर उठ, अभ्यंगस्नान कर, सुतळी बॉम्बने अंग घास, मला काही प्रॉब्लेम नाही. पण अडीच वाजता फटाके? तू जपानमध्ये जन्मलाय का? अरे, असं केलं तर विराट कोहलीची झोपमोड होते आणि दुसऱ्या दिवशी तो बाद होतो!”चैतन्य पुढे म्हणाला, “नरकचतुर्दशीला पहाटे उठायचं, नाहीतर नरकात जावं लागतं, हे खरं. पण अडीच वाजता फटाके फोडून तू नरकात जाणार नाहीस, असं का वाटतं? तू नक्कीच जाशील! आणि नाही गेलास तर मी स्वतः तुला नरकाच्या दारापर्यंत घेऊन जाईन. तिथे तुला लाथ मारून आत पाठवेन आणि मग ‘हॅपी दिवाळी’ म्हणेन!” चैतन्यच्या या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं असून, रात्री उशिरा फटाके फोडणाऱ्यांना त्याने मजेदार पद्धतीने सुनावलं आहे.




