पडद्यावर विनोद करुन लोकांना हसवून जग जिंकणाऱ्या एका हसऱ्या चेहऱ्यामागचं दुःख आज जगासमोर आलं, पण तो चेहरा आता कायमचा शांत झाला. ज्या हृदयाने कोट्यवधी प्रेक्षकांना प्रेम दिलं, ते हृदय जन्मापासूनच शरीराच्या विरुद्ध दिशेला होतं. एक असा दुर्मिळ आजार ज्याने त्यांना आयुष्यभर साथ दिली, पण त्यांनी कधीच आपली जिद्द सोडली नाही. वयाच्या ७१ व्या वर्षी, जेव्हा त्या अजूनही नवीन स्वप्नं रंगवत होत्या, तेव्हाच काळाने त्यांच्यावर झडप घातली. आज त्यांचं घर आणि हॉलिवूडचं अंगण पोरकं झालंय. त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीतील वेगळी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरून निघणार नाही.
होम अलोन या लोकप्रिय चित्रपटात केविनच्या आईची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री आणि कॉमेडियन कॅथरीन ओ’हारा (Catherine O’Hara) यांचे ३० जानेवारी रोजी निधन झाले. ७१ व्या वर्षी लॉस एंजेलिस येथील राहत्या घरी त्यांनी जगाचा निरोप घेतला. ‘शिट्स क्रीक’ (Schitt’s Creek) सारख्या मालिकेतून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कॅथरीन यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
कॅथरीन यांच्या एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, त्या गेल्या काही काळापासून आजारी होत्या. मात्र, त्यांच्या आजाराचे स्वरूप गुप्त ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, या वयातही त्या सिनेसृष्टीत सक्रिय होत्या आणि अनेक नवीन प्रोजेक्ट्सवर काम करत होत्या. याच महिन्यात पार पडलेल्या ‘गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स’मध्ये त्यांना नामांकन मिळाले होते, मात्र प्रकृतीमुळे त्या उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.




