spot_img

Camphor : तुम्ही वापरत असलेला कापूर शुद्ध आहे का? केमिकलयुक्त कापूर ओळखण्याचे सोपे घरगुती उपाय

spot_img

पूजेत वापरल्या जाणाऱ्या कापूरबाबत सावध रहा; आरोग्यासाठी सुरक्षित कापूर कसा ओळखायचा ते जाणून घ्या

पूजाअर्चा, धार्मिक विधी आणि घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी कापूर मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. कापूर जाळल्याने वातावरणातील जंतू नष्ट होतात, मन प्रसन्न होतं आणि एक सौम्य, शांत करणारा सुगंध पसरतो. अनेकजण त्वचेच्या तक्रारींसाठीही कापूर वापरतात. मात्र, आजकाल बाजारात मिळणारा प्रत्येक कापूर हा नैसर्गिकच असेल, याची खात्री देता येत नाही. वाढती मागणी लक्षात घेता अनेक ठिकाणी केमिकलपासून तयार केलेला बनावट कापूर विकला जात आहे, जो आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतो.

खरा कापूर ‘सिनामोमम कॅम्फोरा’ या झाडापासून तयार केला जातो. हे झाड वर्षभर हिरवेगार राहते आणि त्याच्या लाकूड, फांद्या, पाने व सालीपासून स्टीम डिस्टिलेशन या नैसर्गिक प्रक्रियेद्वारे कापूर मिळवला जातो. या प्रक्रियेत वाफ थंड झाल्यानंतर स्फटिकांच्या स्वरूपात कापूर तयार होतो. मात्र, सध्या प्रयोगशाळेत केमिकल्स वापरून तयार होणारा कापूर मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध आहे.

खरा आणि बनावट कापूर ओळखण्यासाठी काही सोप्या पद्धती वापरता येतात. खरा कापूर जाळल्यावर तो पूर्णपणे नाहीसा होतो आणि कोणतीही राख मागे राहत नाही. उलट, केमिकलयुक्त कापूर जाळल्यावर प्लेटवर राखेचे कण दिसतात आणि काळा धूर जास्त प्रमाणात निघतो.

कापूरचा पोत आणि रंगही महत्त्वाचा संकेत देतो. नैसर्गिक कापूर स्फटिकांसारखा, किंचित पारदर्शक असतो आणि सहज तुटतो. अतिशय पांढरा, ढगाळ किंवा फिकट पिवळसर कापूर बहुधा बनावट असतो. तसेच, खऱ्या कापूरचा सुगंध सौम्य आणि मनाला शांत करणारा असतो, तर बनावट कापूरला तीव्र, केमिकलसारखा वास येतो.

पाण्याची चाचणीही उपयुक्त ठरते. नैसर्गिक भीमसेनी कापूर पाण्यात टाकल्यावर तळाशी जातो, तर हलका व केमिकलयुक्त कापूर पाण्यावर तरंगतो किंवा विरघळायला वेळ घेतो. याशिवाय, कापूरचा छोटा तुकडा मोकळ्या भांड्यात ठेवून पाहा. खरा कापूर काही तासांत हळूहळू हवेत विरघळून कमी होत जातो, तर बनावट कापूर तसाच राहतो.

या सोप्या घरगुती पद्धती वापरून तुम्ही खरा आणि केमिकलयुक्त कापूर यामधील फरक सहज ओळखू शकता. आरोग्य आणि श्रद्धा दोन्ही सुरक्षित ठेवण्यासाठी कापूर खरेदी करताना जागरूक राहणं गरजेचं आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ