राज्यातील काही रुग्णालयांमध्ये रुग्णांना महात्मा फुले आरोग्य योजनेचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी हा प्रश्न मांडत सरकारचे लक्ष वेधले.
लोणीकर यांनी सांगितले की, त्यांच्या मतदारसंघातील विठ्ठल कदम नावाच्या शेतकऱ्याला बायपास शस्त्रक्रिया करायची आहे. या शस्त्रक्रियेसाठी साधारणपणे 11 लाख रुपयांचा खर्च येतो. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेतून आणि राज्य सरकारच्या महात्मा फुले आरोग्य योजनेतून मिळून सुमारे सहा लाख रुपयांची मदत मिळायला हवी. मात्र संबंधित रुग्णाला केवळ एक लाख रुपयांची मदत दिली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून त्यांचे ऑपरेशन थांबले असल्याचे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर लोणीकर यांनी सरकारला प्रश्न विचारत, लाभार्थ्याला पूर्ण सहा लाख रुपयांची मदत दिली जाणार का, अशी विचारणा केली. या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले की, महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत बायपाससारख्या शस्त्रक्रियांसाठी ठराविक निकष आहेत आणि रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी स्वतःहून पैसे देण्याची गरज नसते. आयुष्मान भारत योजना जोडल्यामुळे या योजनांतील आर्थिक मर्यादाही वाढवण्यात आल्या आहेत.
जर एखादे रुग्णालय या योजनांचे नियम पाळत नसेल, तर त्यांची नावे द्यावीत. अशा रुग्णालयांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच ही योजना प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांपर्यंत प्रभावीपणे राबवण्याचे आवाहनही त्यांनी केले.




