इन्स्टाग्राम स्टोरीत गाणं गाताना दिसला टीम इंडियाचा ओपनर, फॅन्सकडून कौतुकासोबत ट्रोलिंगही सुरू
23 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर 2’ (Boarder 2) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना पुन्हा जागवली आहे. सनी देओल (Sunny Deol), वरुण धवन (Varun Dhawan) आणि अहान शेट्टी (Ahaan Shetty) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. 1971 च्या भारत-पाक युद्धावर आधारित कथानक आणि जुन्या लोकप्रिय गाण्यांच्या नव्या सादरीकरणामुळे चित्रपटाची चर्चा अधिक वाढली आहे.
दरम्यान, या चित्रपटाच्या लोकप्रियतेचा परिणाम क्रिकेटविश्वातही पाहायला मिळतोय. टीम इंडियाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल सध्या ‘बॉर्डर 2’च्या फीवरमध्ये रंगलेला दिसतोय. नुकताच त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात तो ‘संदेसे आते हैं’ हे गाणं गुणगुणताना दिसत आहे. व्हिडिओसोबत त्याने, “हे गाणं माझ्या डोक्यातून जातच नाही, खूप आवडतं,” असं कॅप्शनही लिहिलं आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून चाहत्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही फॅन्सनी यशस्वीच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे, तर काहींनी त्याच्या गायनावर मजेत ट्रोलिंगही केलं आहे. “क्रिकेटवर लक्ष दे, गाणं तुझं क्षेत्र नाही,” अशा कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.
एकीकडे ‘बॉर्डर 2’ बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा फडकावत असताना, दुसरीकडे यशस्वी जैस्वालचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. चित्रपटाच्या लोकप्रियतेचा प्रभाव केवळ सिनेसृष्टीतच नाही, तर क्रीडाविश्वातही दिसून येतोय.




