60च्या दशकातील रोमँटिक गाण्यांचा सुवर्णकाळ आणि आजही तितकीच टिकून असलेली लोकप्रियता
बॉलिवूडमध्ये दरवर्षी असंख्य चित्रपट प्रदर्शित होतात आणि त्यातील काही गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. मात्र, 1960 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीने रोमँटिक गाण्यांचा असा काही काळ अनुभवला, जो आजही सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. त्या काळातील गाण्यांमध्ये भावना कृत्रिम नव्हत्या, तर त्या साधेपणातून, प्रामाणिकपणातून थेट मनाला भिडणाऱ्या होत्या. त्यामुळेच ही गाणी काळाच्या ओघातही विस्मरणात न जाता अजरामर ठरली.
आजही लाखो श्रोते जुन्या हिंदी गाण्यांशी भावनिक नातं जपून आहेत. अशी गाणी कानावर पडली की जुन्या आठवणी जाग्या होतात, मनाला एक वेगळीच शांतता लाभते आणि क्षणभर काळ मागे सरकल्यासारखं वाटतं. विशेष म्हणजे, हीच गाणी आजच्या तरुण पिढीलाही तितकीच भावत असून त्यांचं आकर्षण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे.
याच सुवर्णकाळातील एक अविस्मरणीय गाणं म्हणजे ‘हाल कैसा है जनाब का’. जरी हे गाणं 1958 मध्ये प्रदर्शित झालं असलं, तरी 60च्या दशकात रोमँटिक आणि हलक्याफुलक्या गाण्यांच्या युगात त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. हे गाणं सुपरहिट चित्रपट ‘चलती का नाम गाड़ी’मधील असून किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजाने त्याला वेगळीच उंची मिळवून दिली.
हे गाणं विनोद आणि प्रेमभावना यांचा सुरेख संगम आहे. किशोर कुमार यांचा खोडकर, मिश्कील अंदाज आणि आशा भोसले यांचा गोड, उत्साही स्वर ऐकताना नकळत चेहऱ्यावर हास्य उमटतं. रिलीज होताच हे गाणं रेडिओवर सतत ऐकू येऊ लागलं आणि अल्पावधीतच ते जनमानसात लोकप्रिय झालं.
या गाण्याचं संगीत एस. डी. बर्मन यांनी दिलं असून त्याची चाल आजही तितकीच ताजी वाटते. गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या ओळी साध्या, मजेशीर आणि लक्षात राहणाऱ्या आहेत. ‘हाल कैसा है जनाब का, क्या खयाल है आपका’ ही ओळ आजही अनेकांच्या ओठांवर सहज रेंगाळते. निरागस रोमँटिक भावना आणि हलकीफुलकी लय यामुळे हे गाणं त्या काळातील संस्कृतीचं सुंदर प्रतिबिंब ठरतं.
या गाण्याने केवळ त्या काळातच नव्हे, तर आजही प्रचंड लोकप्रियता टिकवून ठेवली आहे. लग्नसमारंभ, पार्ट्या, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सोशल मीडियावर हे गाणं वारंवार ऐकायला मिळतं. यूट्यूबवर कोट्यवधी व्ह्यूज मिळवत हे गाणं नव्या पिढीपर्यंत पोहोचलं असून, आजही तितक्याच उत्साहाने आणि आनंदाने ते ऐकलं जात आहे.




