1989 मध्ये तयार झालेला बहुप्रतिक्षित चित्रपट अनेक अडथळ्यांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला, निर्मात्यांसाठी भावनिक क्षण
बॉक्स ऑफिसवर सध्या ‘धुरंधर’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू असतानाच आता आणखी एक ऐतिहासिक क्षण घडला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील तब्बल तीन दशकांपासून रखडलेला ‘हम में शहंशाह कौन’ हा दुर्मीळ चित्रपट अखेर सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सुपरस्टार रजनीकांत (Superstar Rajinikanth) , शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha), हेमा मालिनी (Hema Malini) आणि अनिता राज यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सजलेला हा चित्रपट 1989 मध्ये तयार झाला होता, मात्र विविध कारणांमुळे तो आजपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकला नव्हता.
या चित्रपटाचे दिग्दर्शन दिवंगत हर्मेश मल्होत्रा यांनी केले असून निर्मितीची धुरा राजा रॉय यांनी सांभाळली होती. राजा रॉय हे प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉय यांचे भाऊ आहेत. चित्रपटात प्रेम चोप्रा, अमरीश पुरी, शरत सक्सेना आणि जगदीप यांसारख्या लोकप्रिय कलाकारांच्याही भूमिका आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शूटिंग पूर्ण झाल्यानंतर राजा रॉय लंडनला गेल्याने प्रोजेक्ट अडचणीत सापडला. त्यानंतर वैयक्तिक नुकसान, कौटुंबिक दुःख आणि दिग्दर्शकांच्या निधनामुळे चित्रपट अनेक वर्षे रखडलेला राहिला. मात्र सर्व संकटांवर मात करत राजा रॉय यांनी पुन्हा भारतात येऊन हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा निर्धार केला.
चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत बोलताना त्यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “हा चित्रपट माझ्यासाठी केवळ एक प्रोजेक्ट नाही, तर तो माझ्या मुलासारखा आहे. अनेक कठीण प्रसंग असूनही आम्ही आशा सोडली नाही.”
‘हम में शहंशाह कौन’ हा अॅक्शन आणि सूडाच्या पार्श्वभूमीवर आधारित चित्रपट आहे. प्रेक्षकांना अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून मूळ कथानक आणि कलाकारांच्या अभिनयाचा आत्मा जपण्यात आला आहे. आता या ऐतिहासिक चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे संपूर्ण इंडस्ट्रीचे लक्ष लागले आहे.




