थंडीमुळे वाढणारा कोरडेपणा, निस्तेजपणा आणि मृत पेशींची समस्या दूर करण्यासाठी बॉडी एक्सफोलिएशन ठरतं प्रभावी उपाय
हिवाळ्यात हवेत ओलावा कमी असल्याने त्वचा कोरडी, रफ आणि निर्जीव दिसू लागते. त्यात गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. त्यामुळे अनेकजण फक्त बॉडी लोशन लावून त्वचेची काळजी घेतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात केवळ मॉइश्चरायझर वापरणे पुरेसे नसून शरीराचे एक्सफोलिएशन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
बॉडी एक्सफोलिएशनमुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि नवीन त्वचा उघडी पडते. यामुळे त्वचा अधिक मऊ, नितळ आणि ताजीतवानी दिसते. शिवाय, एक्सफोलिएशन केल्यामुळे लोशन आणि क्रीम त्वचेमध्ये खोलवर शोषले जातात, ज्यामुळे त्वचा जास्त काळ हायड्रेटेड राहते.
थंड हवामानात त्वचा निस्तेज दिसू लागते आणि रंग फिका भासतो. अशावेळी नियमित अंतराने एक्सफोलिएशन केल्यास त्वचेचा नैसर्गिक उजळपणा वाढतो. तसेच, शरीर स्क्रब केल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्याचा थेट परिणाम त्वचेच्या चमकदारपणावर होतो.
हिवाळ्यात कोरडेपणामुळे त्वचेवर मृत पेशी साचतात आणि छिद्र बंद होण्याची शक्यता वाढते. यामुळे मुरुमे आणि इतर त्वचारोग होऊ शकतात. एक्सफोलिएशन केल्याने त्वचेची छिद्र स्वच्छ होतात आणि अशा समस्यांपासून संरक्षण मिळते.
तथापि, एक्सफोलिएशन करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. दररोज स्क्रब करणे टाळावे, कारण यामुळे त्वचा खराब होऊ शकते. त्वचेच्या प्रकारानुसार योग्य एक्सफोलिएटर निवडावा. कोरड्या त्वचेसाठी सौम्य स्क्रब, तर तेलकट त्वचेसाठी थोडा स्ट्रॉंग स्क्रब वापरणे योग्य ठरते.
नैसर्गिक उपायांचा वापर करणं अधिक सुरक्षित मानलं जातं. मध, साखर आणि लिंबू यांसारख्या घरगुती घटकांपासून तयार केलेले स्क्रब त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. मात्र, संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी किंवा त्वचेवर पुरळ, खाज, मुरुमे असल्यास कडक स्क्रब वापरणे टाळावे. योग्य पद्धतीने आणि मर्यादित प्रमाणात केलेले बॉडी एक्सफोलिएशन हिवाळ्यात तुमच्या त्वचेला मऊ, निरोगी आणि तेजस्वी ठेवण्यास मदत करू शकते.




