एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने आपली रणनीती स्पष्ट करत मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाने आपल्या गटनेत्याची निवड केली आहे. कधीकाळी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असणारे अमेय घोले (Amey Ghole) हे शिंदे गटाचे मुंबई महापालिकेत नेतृत्व करणार आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची बैठक पार पाडली. यावेळी एकमताने अमेय घोले यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली. अमेय घोले हे दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मागील महापालिकेत ते आरोग्य समितीवर होते.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर घोले यांनी काही महिन्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अमेय घोले हे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवा सेनेच्या कोअर कमिटीमधील सदस्य होते. मात्र, गणेशोत्सवाच्या दरम्यान घोले यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला.मुंबई महापालिकेचे नियम, वैधानिक समित्यांचे कामकाज आणि प्रशासकीय पेच सोडवण्याचा त्यांचा अनुभव शिंदे गटासाठी मोलाचा ठरणार आहे. शिंदे गटात अमेय घोले यांच्यासह इतरही काही अनुभवी सदस्य नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.




