भाजप–शिंदे सेनेची सत्ता स्थिर; नव्या नियमांवरून वाद, सभागृहात घोषणाबाजीचा गदारोळ.
मुंबई महापालिकेला अखेर नवा महापौर मिळाला असून भाजपच्या रितू तावडे यांनी महापौरपदाची धुरा स्वीकारली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौर झाले आहेत. दोन्ही पदांसाठी विरोधकांकडून उमेदवारी अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. आज पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते त्यांनी औपचारिकरित्या पदभार स्वीकारला. यामुळे जवळपास तीन वर्षे सुरू असलेला प्रशासक राज संपुष्टात येऊन मुंबईत पुन्हा महापौर व्यवस्था लागू झाली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या, तर महायुतीकडे स्पष्ट बहुमत होते. त्यामुळे महापौरपद भाजपकडे जाणे निश्चित मानले जात होते. भाजपने रितू तावडे यांचे नाव जाहीर केले, तर शिंदे सेनेने संजय घाडी यांना उपमहापौरपदासाठी उमेदवारी दिली. संख्याबळ अपुरे असल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला.
रितू तावडे या भाजपच्या मुंबईतील दुसऱ्या महापौर ठरल्या आहेत. यापूर्वी १९८२ मध्ये प्रभाकर पै हे भाजपचे पहिले महापौर होते. तावडे या मुंबईतील भाजपच्या पहिल्या महिला महापौर ठरल्या आहेत. घाटकोपर येथील नगरसेविका म्हणून त्यांनी काम केले असून शिक्षण समितीच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांचा अनुभव आहे.
दरम्यान, ठाकरे गटाची मुंबई महापालिकेवरील तब्बल २४ वर्षांची सत्ता यावेळी संपुष्टात आली. राज्यातील सत्तांतरानंतर पालिकेतील सत्ताही त्यांच्या हातातून गेली आहे.
महापौर निवडीच्या प्रक्रियेत नव्या नियमांमुळे वाद निर्माण झाला. यापूर्वी ज्येष्ठ नगरसेवक किंवा मावळते महापौर हे पीठासीन अधिकारी असत. मात्र सरकारच्या नव्या अधिसूचनेनुसार प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला हे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे आयुक्त भूषण गगराणी यांनी पीठासीन अधिकारी म्हणून भूमिका पार पाडली. ठाकरे गटाने या बदलावर आक्षेप घेतला असून, हा निर्णय सत्ताधाऱ्यांना अनुकूल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
निवड प्रक्रियेदरम्यान सभागृहाबाहेर आणि आतही वातावरण तापलेले दिसले. बीएमसी मुख्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनपात दाखल होताच भाजपकडून घोषणाबाजी सुरू झाली. त्याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाकडूनही जोरदार घोषणा देण्यात आल्या. काही काळ सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नंतर नियंत्रणात आली असली, तरी पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमधील तणाव स्पष्टपणे दिसून आला.
मुंबईच्या राजकारणात या घडामोडींमुळे नवे समीकरण तयार झाले असून आगामी काळात महापालिकेतील कारभार कसा रंगतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




