spot_img

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गट सज्ज; ११५ ते १२० जागांवर लढवण्याची तयारी!

spot_img

मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Mumbai BMC Election) अगदी जवळ आल्यामुळे सर्वच पक्षांमध्ये चांगलाच हलकल्लोळ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. महायुतीत आपले वर्चस्व दाखवण्यासाठी शिंदे गटाने मोठं मेगा प्लॅनिंग आखलं असून त्यासाठीची रणनीतीही तयार करण्यात येत आहे.

विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाने या निवडणुकीत तब्बल ११५ ते १२० जागांवर लढवण्याचा प्रस्ताव तयार ठेवला आहे. यावेळी फक्त चांगल्या जागांवर उमेदवार उतरवण्यावर भर दिला जाणार असून, महायुतीचा महापौर बनवणे हे शिवसेनेचं मुख्य लक्ष्य आहे. पक्षाकडून प्रत्येक मतदारसंघानुसार स्वतंत्र योजना आखण्यात येत आहे. स्थानिक स्तरावर संघटना मजबूत करणे आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट काम करणे यावर भर दिला जात आहे.

मुंबई महापालिकेत एकूण २२७ जागा आहेत. त्यामुळे शिवसेनेने इतक्या मोठ्या प्रमाणावर जागांची मागणी केली तर भाजप आणि इतर मित्रपक्ष नाराज होण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी जागावाटपावर महायुतीत मोठी चर्चा रंगणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

यापूर्वी अविभाजित शिवसेना आणि भाजप यांनी समान जागांवर लढवले होते. मात्र, फुटीनंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल शिंदे गटासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न ठरणार आहे.

दरम्यान, शिंदे गटाच्या या आक्रमक तयारीमुळे विरोधकांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा भगवा फडकवण्यासाठी शिवसेना शिंदे गट संपूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आता भाजप आणि इतर मित्रपक्षांसोबतच्या जागावाटपावर अंतिम निर्णय कधी आणि कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ