१० प्रभागांमध्ये बंडखोरांमुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार पराभूत, युतीत तणाव वाढला
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप–शिवसेना महायुतीने बहुमताचा आकडा गाठला असला, तरी या विजयामागे अंतर्गत विसंवादाची मोठी किंमत मोजावी लागल्याचं चित्र समोर आलं आहे. विशेषतः शिवसेना शिंदे गटाच्या अनेक उमेदवारांचा पराभव भाजपच्या बंडखोर उमेदवारांमुळे झाल्याचं निवडणूक आयोगाच्या अंतिम आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. यामुळे युतीतील समन्वयावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून शिवसेनेच्या गोटात असंतोषाचं वातावरण आहे.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांविरोधात अपक्ष किंवा इतर पक्षांच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. याचे थेट परिणाम निकालात दिसून आले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, किमान १० प्रभागांमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी शिवसेनेची हक्काची मते फोडली, ज्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना निसटता पराभव पत्करावा लागला.
राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, जर ही बंडखोरी वेळेत रोखण्यात आली असती, तर शिवसेनेचे किमान १० नगरसेवक अधिक निवडून आले असते. अंधेरी पूर्व, कुर्ला, वांद्रे पूर्व, सायन कोळीवाडा, दिंडोशी, वर्सोवा, मागाठाणे, अणूशक्ती नगर यांसारख्या अनेक प्रभागांमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी निर्णायक भूमिका बजावली.
काही ठिकाणी तर पराभवाचा फरक अत्यल्प असताना बंडखोरांना मिळालेली मते हजारोंच्या घरात होती. यामुळे ‘जागा मिळाल्या, पण मते का फिरली नाहीत?’ असा सवाल शिवसेनेच्या गोटातून उपस्थित केला जात आहे. जागावाटपात शिवसेनेने मुंबईत ३० हून अधिक प्रभागांमध्ये भाजपच्या इच्छुकांवर मात केल्याचा राग स्थानिक पातळीवर बंडखोरीच्या रूपाने व्यक्त झाल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर युतीधर्म पाळला गेला का, की वैयक्तिक राजकारणाला प्राधान्य देण्यात आलं यावर आता महायुतीतच गंभीर चर्चा सुरू झाली आहे.




