अर्ज भरण्यास अवघे ३८ तास उरले असताना एबी फॉर्मचा पत्ता नाही; भाजपची मात्र उमेदवारी जाहीर करण्यात आघाडी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत अवघ्या ३८ तासांवर येऊन ठेपली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर करत एबी फॉर्म वाटप सुरू केले असताना शिवसेना शिंदे गट मात्र अजूनही निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसत आहे.
भाजप, ठाकरे गट आणि मनसेसह इतर पक्षांनी आपल्या उमेदवारांना अधिकृत फॉर्म देऊन प्रचारालाही सुरुवात केली आहे. मात्र, शिंदे गटाकडून अद्याप एकाही उमेदवाराच्या हाती एबी फॉर्म न पोहोचल्याने नगरसेवकपदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. ऐनवेळी आपली उमेदवारी कापली जाईल की काय, या भीतीने अनेक जण धास्तावले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीत शिंदे गटाने तब्बल १२५ जागांची मागणी केली होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये त्यांना केवळ ८० ते ८७ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा असून महायुतीत शिवसेनेची कोंडी केली जात असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, भाजपने मुंबईत आक्रमक पवित्रा घेतला असून आतापर्यंत ६६ उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. तेजस्वी घोसाळकर, नील सोमय्या, मकरंद नार्वेकर आणि रवी राजा यांसारख्या वजनदार नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भाजपच्या या वेगवान हालचालींमुळे शिंदे गटातील इच्छुकांची चिंता आणखी वाढली आहे.
उद्या (३० डिसेंबर) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आपला वॉर्ड शिंदे गटाकडे राहणार की मित्रपक्षाच्या वाट्याला जाणार, याबाबत संभ्रम कायम आहे. सध्या वर्षा निवासस्थानी उशिरापर्यंत बैठकांचे सत्र सुरू असून आज रात्रीपर्यंत एबी फॉर्म वाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, झालेला विलंब प्रचारावर परिणाम करू शकतो, अशी भीती कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.




