“कोस्टल रोड, मेट्रो, बीडीडी चाळ महायुतीमुळेच” – वरळीतील सभेत मुख्यमंत्र्यांचा दावा
मुंबईच्या विकासकामांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला मोठ्या प्रमाणात विकासकामं मिळाली, मात्र पूर्वी सत्तेत असताना त्यांना ही कामं का करता आली नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प आणि बीडीडी चाळींचा पुनर्विकास कोणी केला, हे मुंबईकरांना माहीत असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.
प्रत्येक विकासकामाला स्थगिती देण्याचं काम कुणी केलं, असं विचारलं तर जनता एकच नाव सांगेल, असा टोला फडणवीसांनी लगावला. गिरणी कामगारांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी फिक्स डिपॉझिटच्या मुद्द्यावर टीका करत, त्या निधीतून मुंबईतच घरं देता आली असती, असं म्हटलं. बीडीडी चाळींचा प्रश्न अनेक वर्षं प्रलंबित होता, मात्र महायुती सरकारनं ठाम निर्णय घेऊन मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार होऊ दिलं नाही, असा दावा त्यांनी केला.
मुंबईकरांचं जीवन बदलणारी महायुती सरकार सत्तेत असल्याचं सांगत फडणवीस म्हणाले की, आगामी काळात सुमारे साडेचारशे किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क पूर्ण केलं जाईल. २०२८-२९ पर्यंत मुंबई आणि विस्तारित मुंबईत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अवघ्या ५९ मिनिटांत प्रवास करता येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
झोपडपट्टीवासीयांसाठी घरांची सोय, एसआरएच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजना आणि म्हाडामार्फत उभारण्यात आलेल्या इमारतींचा उल्लेख करत त्यांनी महायुती सरकारनं घरांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं. वरळी येथील एनएससीआय डोममध्ये भाजप-शिंदेसेनेच्या संयुक्त प्रचार मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.




