प्रभाग क्रमांक ३ मध्ये शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या नावात बदल; मतदान थांबवून निवडणूक रद्द करण्याची मागणी
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा थरार सुरू असतानाच टिटवाळ्यातून एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टिटवाळा प्रभाग क्रमांक ३ मध्ये मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनवर एका उमेदवाराचे नाव चुकीच्या पद्धतीने छापले गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार शेखर अप्पाराव वाकोडे यांच्या नावाऐवजी ईव्हीएमवर आणि मतदान केंद्राबाहेरील अधिकृत यादीत “शेख अप्पाराव वाकोडे” असे नाव दर्शवण्यात आले आहे. या चुकीमुळे उमेदवाराची ओळख, जात आणि धर्म बदलल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
आज सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर स्वतः मतदानासाठी गेलेल्या शेखर वाकोडे यांच्या लक्षात हा प्रकार आला. नावातील या चुकीमुळे अनेक मतदार संभ्रमात पडले असून, “तुमचे नाव यादीत दिसत नाही” असे प्रश्न विचारण्यासाठी मतदारांनी त्यांना फोन केल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत शेखर वाकोडे म्हणाले की, “मी गेल्या पाच वर्षांपासून या प्रभागात सातत्याने काम करत आहे. मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. नाव दुरुस्त करण्याची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली असता ती नाकारण्यात आली. हा माझ्यावर अन्याय असून या प्रभागातील मतदान तात्काळ थांबवून निवडणूक रद्द करण्यात यावी.”
दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटले की, “राज्यात अनेक ठिकाणी मतदार यादी आणि मतदान प्रक्रियेत चुका समोर येत आहेत. मात्र टिटवाळ्यात घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. उमेदवाराची ओळखच बदलणे हा साधा घोळ नाही. हा प्रकार जाणूनबुजून केला गेला का, याची सखोल चौकशी झाली पाहिजे.”
तसेच या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रभाग क्रमांक ३ ची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रभागात भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस यांसह अनेक बलाढ्य उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अशा चुरशीच्या लढतीत एका प्रमुख उमेदवाराच्या नावात झालेला हा घोळ निवडणूक निकालावर परिणाम करू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणावर निवडणूक आयोग काय निर्णय घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




