अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर तोडगा निघण्याचे संकेत
राज्यात सत्तेत एकत्र असलेले राजकीय पक्ष महापालिका निवडणुकांमध्ये मात्र एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र पाहायला मिळाले. केवळ निवडणुकीपुरतेच नव्हे, तर प्रचारादरम्यान एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोपही झाले. विशेषतः अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका भाजप आणि शिवसेना शिंदे गटाविरोधात स्वबळावर लढवल्या. मात्र या दोन्ही ठिकाणी अजित पवारांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.
२०१७ च्या तुलनेत २०२६ च्या महापालिका निवडणुकांमध्ये राजकीय चित्र पूर्णपणे बदललेले दिसून आले. राज्यात महायुती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये समीकरणे बदलल्याचे स्पष्ट झाले. या निवडणुकांमध्ये भाजप राज्यभरात सर्वात मोठा पक्ष ठरला असून अनेक महापालिकांवर भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. मुंबई महानगरपालिकेतही भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत.
निकालानुसार भाजप पहिल्या क्रमांकावर, शिवसेना ठाकरे गट दुसऱ्या तर शिवसेना शिंदे गट तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई महापालिकेत भाजपाला ८९ जागा, तर शिवसेना शिंदे गटाला २९ जागा मिळाल्या. दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली असली तरी भाजपला शिंदे गटाच्या पाठिंब्याशिवाय सत्ता स्थापन करणे शक्य नाही.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौर पदावर अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला पुढे करत आपली भूमिका स्पष्ट केली. याचदरम्यान, शिंदे गटाच्या सर्व नगरसेवकांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांचा मुक्काम हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील काही दिवस तेथेच वास्तव्य असणार आहे.
दरम्यान, आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर बसणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात यासंदर्भात फोनवर चर्चा झाली आहे. मुंबईकरांनी दिलेल्या कौलाचा सन्मान राखला जाईल आणि महायुतीत कोणताही तणाव निर्माण होणार नाही, असा विश्वास दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे.
दावोस दौऱ्यानंतर फडणवीस आणि शिंदे प्रत्यक्ष भेटून अंतिम निर्णय घेणार असल्याचेही समजते. तसेच ठाकरे गट भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नये, यावरही दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.




