महापालिका निवडणुकीचा धुराळा उडाला आहे! पण यावेळची निवडणूक विकासाच्या मुद्द्यांपेक्षा ‘बंडाच्या’ निशाणीनेच जास्त गाजताना दिसतेय. आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख, आणि चित्र स्पष्ट झालंय की जवळपास प्रत्येक पक्षाला बंडखोरीने ग्रासलंय. पण यात सर्वात जास्त चर्चा होतेय ती म्हणजे भारतीय जनता पक्षाची. शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपमध्ये सध्या ‘नाराजीनाट्य’ रंगलंय. विशेषतः छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटलाय. पण सोशल मीडियावर मात्र एक वेगळीच चर्चा आहे— जेव्हा इतर पक्ष फोडले, तेव्हा तुम्ही टाळ्या वाजवल्या; मग आता रडता कशाला? त्यामुळे भाजपचे कार्यकर्त्यांसोबत जे झालय, जे चाललय ते योग्यच होतय असे म्हणणारे लोक सध्या जास्त आहेत.
भाजपमध्ये सध्या अभूतपूर्व परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक वर्षांपासून सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी पक्षात आलेल्या ‘आयारामांना’ उमेदवारी दिली गेली. नाशिकमध्येही हेच चित्र आहे. अनेक ठिकाणी तिकीट न मिळाल्याने कार्यकर्ते ढसाढसा रडताना दिसले. काही कार्यकर्त्यांनी स्थानिक नेत्यांच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केलंय. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, उमेदवारी न मिळाल्याचा धसका घेतल्याने एक-दोन कार्यकर्त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. काही ठिकाणी तर तिकीट न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचलं, लाठ्याकाठ्या खाल्या, त्यांना आज स्वतःच्याच घरात परकं झाल्यासारखं वाटतंय. “पक्षाने आमची उपेक्षा केली,” ही त्यांची भावना आता चव्हाट्यावर आली आहे.
समाजमाध्यमांवर सध्या या कार्यकर्त्यांना सहानुभूती मिळण्याऐवजी त्यांच्यावर टीका जास्त होत आहे. का? याचं उत्तर आहे गेल्या काही वर्षांतील राजकीय घडामोडींमध्ये. भाजपने जेव्हा इतर पक्ष फोडले, तेव्हा याच निष्ठावान कार्यकर्त्यांनी फटाके फोडले होते. ज्या नेत्यांवर भाजपनेच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते, त्यांना जेव्हा पक्षात घेऊन मंत्रिपदं दिली गेली, तेव्हा हे कार्यकर्ते कुठे होते? तेव्हा पक्षाची ‘निष्ठा’ आणि ‘तत्व’ कुठे गेली होती? सोशल मीडियावरील सामान्य लोकांचे म्हणणे आहे की, “दुसऱ्याचं घर जळताना ज्यांना आनंद झाला, आज स्वतःचं घर जळताना त्यांनी रडू नये.”
नेटकऱ्यांच्या मते, हे कार्यकर्ते त्याच पात्रतेचे आहेत. जोपर्यंत दुसऱ्या पक्षातील नेते येत होते आणि भाजपची ताकद वाढत होती, तोपर्यंत कोणालाही लोकशाहीचा किंवा निष्ठेचा विचार आला नाही. पण जेव्हा त्याच नेत्यांमुळे आज स्वतःची उमेदवारी कापली गेली, तेव्हा या कार्यकर्त्यांना ‘मूल्यांची’ आठवण झाली. त्यामुळे आज सामान्य माणूस विचारतोय, पक्ष फोडणे ही जर ‘चाणक्यनीती’ होती, तर मग आजची बंडखोरी ‘गद्दारी’ कशी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांचे स्वागत करताना तुमची सद्सद्विवेकबुद्धी कुठे होती आयारामांना तिकीट मिळणार हे उघड असताना, निष्ठावंतांनी वेळीच आवाज का उठवला नाही? हा भाजपच्या रणनीतीचा फटका आहे की भविष्याची सोय?
भाजपने नेहमीच ‘निवडून येण्याची क्षमता’ (Electability) याला प्राधान्य दिलंय. मग त्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांचा बळी द्यावा लागला तरी चालेल, अशीच पक्षाची रणनीती आहे. वापरा आणि फेकून द्या याच तत्वावर भाजप नेहमीच काम करत आलाय. पण यामुळे पक्षाच्या मूळ केडरमध्ये मोठी पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्या कार्यकर्त्यांनी संघटन उभं केलं, तेच जर आज रस्त्यावर उतरून नेत्यांना जाब विचारत असतील, तर आगामी निवडणुकीत याचा फटका भाजपला बसणार का? की पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर ही बंडखोरी शमवली जाईल? आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी किती जण माघार घेतात, यावर बरंच काही अवलंबून आहे.




