ड्रामा, धमाल आणि धक्क्यांचा तिहेरी डोस; राखीच्या आगमनाने घरातील सगळी समीकरणं बदलणार
‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाने सध्या संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात चर्चेची लाट उसळवली आहे. या सीझनमधील पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री कोणाची असणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर या सस्पेन्सवर पडदा उठला असून, शोमध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आहे ती म्हणजे राखी सावंतने!
“ड्रामा, धक्का आणि धमाल” या शब्दांची जिवंत प्रतिमा असलेली राखी सावंत आता ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात एंटरटेनमेंटची त्सुनामी घेऊन आली आहे. तिच्या आगमनाने घरात आधीच तयार झालेली नाती, गटबाजी, रणनीती आणि गैरसमज हादरून जाणार आहेत, हे निश्चित.
राखी सावंत ही अशी स्पर्धक आहे जी कोणाशी मैत्री करायची, कोणाशी वाद घालायचा, कोणाला भावनिक खेळात गुंतवायचं आणि कोणाच्या नसा दाबायच्या हे सगळं अगदी अचूक ओळखते. त्यामुळे तिच्या एन्ट्रीने प्रत्येक स्पर्धकाचा खेळ नव्याने तपासला जाणार आहे.
घरात पाऊल ठेवताना राखी सावंतने नेहमीच्या बिनधास्त शैलीत आपली भूमिका स्पष्ट केली. “मी घरात आली की गेमचं गणित बदलतं. माझ्याशिवाय ‘बिग बॉस मराठी’ अपूर्ण आहे. मी जेव्हा घरात जाते, तेव्हा इतरांचा आवाज आपोआप बंद होतो,” असं ठाम मत तिने व्यक्त केलं. याशिवाय, विविध कॉस्च्युम्स, हटके गेमप्लॅन आणि पूर्ण धमाल पाहायला मिळेल, असंही तिने सांगितलं.
शोचा होस्ट रितेश देशमुख यांचं कौतुक करत, “रितेश सर अप्रतिम कलाकार आहेत. मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रासाठी मी हा शो करत आहे, याचा मला अभिमान आहे,” असं राखीने नमूद केलं.
राखी सावंतची एन्ट्री आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून, तिच्या येण्याने घरात नेमकं काय उलथापालथ होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मनोरंजनाचा भारी डोस देण्यासाठी राखी सज्ज आहे. आता बघायचं, कोण टिकतं आणि कोण ढासळतं!




