घटस्फोटाची केस सुरू असतानाच वाढदिवसाच्या व्हिडिओवरून नवा वाद, महिलेच्या उपस्थितीने उडाली चर्चा
बॉलिवूड असो वा भोजपुरी चित्रपटसृष्टी, कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चांना उधाण येत असते. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता आणि भाजप नेते पवन सिंह यांच्याभोवती फिरत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्यांमुळे पवन सिंह यांनी तिसरं लग्न केल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
महत्त्वाचं म्हणजे पवन सिंह यांच्या दुसऱ्या विवाहाचा घटस्फोट अद्याप कायदेशीररित्या झालेला नाही, अशी माहिती समोर येत आहे. यामुळेच या कथित तिसऱ्या लग्नाच्या चर्चांनी अधिकच वादंग माजवलं आहे. पवन सिंह यांच्या खासगी आयुष्याबाबत याआधीही अनेकदा आरोप, अफेअर्स आणि वाद निर्माण झालेले आहेत.
काही महिन्यांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी एका अभिनेत्रीशी केलेल्या अयोग्य वर्तनामुळे त्यांच्यावर तीव्र टीका झाली होती. हजारो प्रेक्षकांसमोर अभिनेत्रीच्या कंबरेवर हात ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. या घटनेनंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नीने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत घटस्फोट देण्यास नकार दिला होता आणि लग्न वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तिने सांगितले होते. सध्या या दोघांमधील घटस्फोटाची केस न्यायालयात सुरू आहे.
दरम्यान, पवन सिंह यांनी नुकताच आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या पार्टीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पवन सिंह केक कापताना दिसत असून, काही नेटकऱ्यांनी ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचाही दावा केला आहे.
या व्हिडिओमधील सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे त्यांच्यासोबत दिसणारी एक महिला. नवरीसारख्या अवतारात दिसणाऱ्या या महिलेच्या भांगात कुंकू भरलेले स्पष्ट दिसते. ती महिला पवन सिंह यांना केक कापण्यात मदत करतानाही दिसत असल्यामुळे नेटकऱ्यांनी विविध तर्क लावायला सुरुवात केली आहे. याच आधारावर पवन सिंह यांनी गुपचूप तिसरं लग्न केल्याचा अंदाज सोशल मीडियावर व्यक्त केला जात आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये पवन सिंह यांच्यासोबत दिसणारी महिला भोजपुरी अभिनेत्री महिमा सिंग असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या प्रकरणावर पवन सिंह किंवा त्यांच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे हा प्रकार सध्या चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरत आहे.




