spot_img

Bhai Jagtap on BMC Election 2026 : काँग्रेस स्वबळावर लढणार, ठाकरे बंधूंशी युती नाही – भाई जगताप

spot_img

स्थानिक कार्यकर्त्यांच्या इच्छेला प्राधान्य; मनसेशी मतभेद कायम, काँग्रेस हायकमांड घेणार अंतिम निर्णय

मुंबई: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढण्याचा निर्धार करत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी ठाकरे बंधू उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत युती न करण्याचा स्पष्ट पवित्रा घेतला आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जाणारे भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी पक्षाच्या राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या नाहीत, असे सांगत त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याची संधी देण्याची मागणी केली.जगताप म्हणाले, “मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना स्पष्टपणे सांगितले होते की, आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही निवडणूक लढणार नाही. राज ठाकरेंचा तर प्रश्नच उद्भवत नाही. या निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांनी लढाव्यात, त्यांना निर्णय घेऊ द्यावा.

काँग्रेस कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर वाहत आहेत, त्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळायला हवी.” त्यांनी पुढे सांगितले की, महाविकास आघाडीत (मविआ) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती असली, तरी आता शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर लढण्याचा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांवर सोपवावा, अशी त्यांची भूमिका आहे.दरम्यान, काँग्रेसच्या मिडिया सेलचे प्रमुख सचिन सावंत यांनीही याबाबत मत मांडले. ते म्हणाले, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत (मनसे) आमचे मूलभूत मतभेद आहेत. याबाबत कोणतीही शंका नाही. काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सर्व नेत्यांनी आपली मते मांडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात स्थानिक नेत्यांशी चर्चा करून हायकमांड अंतिम निर्णय घेईल.” मुंबई काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये भाई जगताप यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने काँग्रेसच्या स्वबळाच्या रणनीतीला बळ मिळाले आहे. आता काँग्रेस हायकमांड याबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ