भाग्यश्री न्हाळवेवर दु:खाचा आघात; लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांत आईचं निधन
‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’, ‘रमा राघव’, ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे सध्या अत्यंत कठीण काळातून जात आहे. भाग्यश्रीच्या आईचं निधन झालं असून, सोशल मीडियावर लिहिलेल्या हृदयद्रावक पोस्टमधून तिने हे दु:ख चाहत्यांशी शेअर केलं आहे.
अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच भाग्यश्रीचं लग्न झालं होतं. त्या काळात तिची आई आजारी होती. आपल्या प्रकृतीची जाणीव असल्यामुळेच त्यांनी लेकीचं लग्न लावून दिलं. मात्र मुलीचा संसार पाहण्यासाठी आपण या जगात राहणार नाही, याची जाणीव त्यांना होती, असं भाग्यश्रीने आपल्या पोस्टमधून व्यक्त केलं आहे.
लग्नातील आईसोबतचा फोटो शेअर करत भाग्यश्रीने मनातील भावना शब्दांत मांडल्या. “लग्नाला दोन महिने झाले, पण या दोन महिन्यांत आईने मला एकदाही फोन केला नाही. कारण ‘सासरी गेलेल्या मुलीला वारंवार फोन करू नये, तिचं लक्ष संसारात लागत नाही’ असं ती म्हणायची. आणि आता माझ्या आयुष्यात असा एक क्षण आलाय, की आईचा फोन कधीच येणार नाही,” असं लिहित तिने वेदना व्यक्त केल्या.
भाग्यश्रीने पुढे लिहिलं की, “आई, मला तुझ्याजवळ शेवटपर्यंत राहायचं होतं म्हणून मला लग्न करायचं नव्हतं. पण तू ठामपणे सांगितलंस – ही माझी शेवटची इच्छा आहे. माझ्यासाठी लग्न कर, मागे वळून बघू नकोस. तू एक मुलगी म्हणून खूप केलं आहेस. आता स्वतःसाठी जग. तुझ्या एका भेटीतच तू मला लग्नाचा निर्णय घ्यायला भाग पाडलंस.”
आईच्या निर्णयामागचा अर्थ तिच्या जाण्यानंतर उमगल्याचंही भाग्यश्रीने सांगितलं. “आज तू गेल्यावर मला कळलं, तू माझ्यासाठी निवडलेला जोडीदार आणि घर खरंच किती योग्य आहे,” असं तिने नमूद केलं.
पोस्टमध्ये पुढे लिहिताना ती अधिक भावूक झाली. “तुझ्यासाठी मी लग्न केलं, पण तू फक्त माझं लग्न पाहिलंस. माझा संसार पाहण्यासाठी तू आयुष्यभर माझ्यासोबत असायला हवी होतीस. माझ्या नारायणाला आता कोण नमस्कार करणार? दर पौर्णिमेला मी सत्यनारायणाला दिवा लावून तुझ्यासाठी प्रार्थना करायचे. पण कालच्या पौर्णिमेला मी तुझ्या नारायणासोबत तुझ्या चितेला नमस्कार करत होते.”
“आई, तुला सगळं आधीच कळत होतं. म्हणूनच तू माझी सगळी सोय करून गेलीस. आईला लेकराचं चांगलं कळतं हे खरंय. पण तरीही तू मला हवी होतीस. आता मला ‘राणा’ म्हणणार कोण? तू मला संसारात पाडलंस आणि स्वतः मात्र निघून गेलीस. पण तू सांगितल्याप्रमाणे मी मागे वळून बघणार नाही, हे माझं तुला वचन आहे,” अशा शब्दांत भाग्यश्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
भाग्यश्रीच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी तिच्या दु:खात सहभागी होत, तिला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. आई किंवा वडील गमावण्याइतकं मोठं दु:ख आयुष्यात दुसरं काहीच नाही, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.




