spot_img

Bhagatsingh Koshyari on Raj Thackeray : राज ठाकरेंना मोदींची भीती? भगतसिंह कोश्यारींचा थेट सवाल; नव्या राजकीय वादाला सुरुवात

spot_img

संघाच्या कार्यक्रमावरून राज ठाकरेंची टीका, कोश्यारींचे प्रत्युत्तर; अजित पवार आणि नाशिक कॉरिडॉरवरही भाष्य.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमावर टीका करताना सरसंघचालकांनाही अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले होते. वरळी डोम येथे झालेल्या संघाच्या कार्यक्रमाला बॉलिवूड कलाकारांसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी टोमणा लगावला. लोक भीतीपोटी अशा “रटाळ प्रवचनांना” उपस्थित राहतात, सत्ता नसती तर हेच लोक आले असते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. या वक्तव्यावरून भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया येण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरेंवर थेट निशाणा साधला. संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले लोक नरेंद्र मोदींना घाबरले होते, असे म्हणणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उलट राज ठाकरेच पंतप्रधान मोदींना जास्त घाबरत आहेत, असा दावा त्यांनी केला.

“राज ठाकरे यांचा मी सन्मान करतो, मात्र त्यांनी मोदींना घाबरण्याची गरज नाही. त्यांच्या जवळ जावे. प्रभू श्रीरामाप्रमाणे नरेंद्र मोदीही सर्वांना समान मानतात,” असा सल्ला कोश्यारी यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत राहणाऱ्यांनी भीती बाळगू नये, चुकीच्या कामांचीच भीती वाटली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना कोश्यारी म्हणाले की, अजित पवार हे मोठे नेते होते आणि त्यांनी कधीही वैयक्तिक टीका केली नाही. “मी त्यांना कधी विसरणार नाही,” असे ते म्हणाले. घातपाताचा संशय असल्यास सरकारकडे चौकशीची मागणी करावी, असा सल्लाही त्यांनी रोहित पवारांना दिला.

नाशिक दौऱ्यादरम्यान कोश्यारी यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. ४० वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी येथे आल्याचे सांगत, राज्यपाल असतानाही नाशिक भेट दिल्याचे त्यांनी नमूद केले. अयोध्येप्रमाणे नाशिकमध्येही धार्मिक कॉरिडॉर उभारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.कोश्यारींच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, राज ठाकरे यांची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ