spot_img

Belgaum News : श्रीमंतांना जाळ्यात ओढणारी फॅशन डिझायनर अटकेत; हनी ट्रॅप प्रकरण उघड

spot_img

इंस्टाग्राम-फेसबुकवर ओळख वाढवून लॉजमध्ये बोलवायची, बाथरूममध्ये अडकवून पैसे आणि मोबाईल लुटण्याचा प्रकार.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून लोकांची फसवणूक करण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशाच एका प्रकरणात बेळगावमध्ये श्रीमंत व्यक्तींना लक्ष्य करून हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. टिळकवाडी पोलिसांनी ही कारवाई करत दीपा अवतगी (वय ३३) या फॅशन डिझायनर महिलेला ताब्यात घेतले आहे. ती बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूर येथील रहिवासी आहे. या प्रकरणातील तिचा साथीदार शिवानंद मठपती सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानंद हा बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील रहिवासी असून तो श्रीमंत व्यक्तींबाबत माहिती गोळा करून दीपाला देत असे. त्यानंतर दीपा इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्या व्यक्तींशी मैत्री करायची. ओळख वाढल्यानंतर ती त्यांच्याशी खासगी आणि अश्लील स्वरूपाच्या गप्पा मारत त्यांचा विश्वास जिंकायची.

यानंतर ती संबंधित व्यक्तींना बेळगाव शहरातील एका लॉजमध्ये भेटण्यासाठी बोलवायची. भेटीसाठी आलेल्या व्यक्तीला ती आंघोळ करून येण्यास सांगायची. तो बाथरूममध्ये गेल्यानंतर ती बाहेरून दरवाजा बंद करून त्याला आत अडकवायची. त्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाईल, पैसे तसेच वाहनांच्या चाव्या घेऊन ती तिथून पसार होत असे.

यानंतर दुसऱ्या फोन नंबरवरून ती त्या व्यक्तीशी संपर्क साधून पैशांची मागणी करत असे. पैसे न दिल्यास पोलिसांत तक्रार दाखल करून बदनामी करण्याची धमकीही ती देत असे. या संपूर्ण प्रकाराचे काही दृश्य लॉजमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकरणी टिळकवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून निरीक्षक परशुराम पूजेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास करत आरोपी दीपाला अटक केली. तिच्या साथीदाराचा शोध सध्या सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून एकूण ३२ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात एक टोयोटा फॉर्च्युनर कार, एक मारुती सुझुकी एस-क्रॉस कार, ११ मोबाईल फोन, एक टॅब, एक डोंगल, तीन वाहनांच्या चाव्या आणि सुमारे १४ हजार रुपये रोख रक्कम यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ