सुफी, भक्ती आणि शास्त्रीय संगीताचा अनोखा संगम म्हणजे कैलाश खेर यांचा आवाज. त्यांच्या गाण्यांमध्ये केवळ सूर नसतात, तर खोल अर्थ आणि भावना असतात. 700 हून अधिक गाण्यांना आवाज देणाऱ्या कैलाश खेर यांनी ‘अल्लाह के बंदे’, ‘रब्बा इश्क न होवे’सारख्या गाण्यांतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मात्र, सर्वाधिक गैरसमज झालेलं गाणं म्हणजे ‘आज मेरे पिया घर आवेंगे’.
आजही हे गाणं लग्नसमारंभात, सोशल मीडियावर रोमँटिक अर्थाने मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. नवरी आपल्या पतीच्या प्रतीक्षेत असल्याचं चित्र अनेकांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण प्रत्यक्षात या गाण्याचा प्रेमाशी नाही, तर अध्यात्माशी थेट संबंध आहे. हे गाणं आत्मा आणि परमात्म्याच्या मिलनाचं प्रतीक आहे.
‘हे री सखी मंगल गाओ री, धरती अंबर सजाओ री…’ या ओळी आत्म्याच्या अंतिम प्रवासाचं वर्णन करतात. देह त्याग केल्यानंतर आत्मा परमात्म्याला भेटण्यासाठी सज्ज होत आहे, वाईट कर्मांचा त्याग करून शुद्ध अवस्थेत त्या अंतिम मिलनासाठी तयार होत आहे, असा त्यामागचा गूढ अर्थ आहे.
या गाण्याची निर्मिती कैलाश खेर यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अत्यंत भावनिक घटनेशी जोडलेली आहे. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या वडिलांच्या अखेरच्या क्षणी ते सतत ‘हरे राम’ आणि देवाचं नाव घेत होते. त्या क्षणी ते पूर्णपणे अध्यात्मात विलीन झाले होते. काही क्षणांतच त्यांनी शांततेत शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर असलेलं समाधान जणू परमात्म्याशी झालेल्या मिलनाचं साक्षीदार होतं.
वडिलांच्या निधनानंतरचा तो अनुभव कैलाश खेर यांच्या मनात खोलवर कोरला गेला. संगीताची पहिली शिकवण देणाऱ्या वडिलांच्या आठवणींमधूनच ‘आज मेरे पिया घर आवेंगे’ या गाण्याचा जन्म झाला. त्यामुळे हे गाणं त्यांच्यासाठी केवळ एक रचना नसून, वडिलांशी जोडलेली आध्यात्मिक भावना आहे. आजही हे गाणं ऐकताना अनेकांना प्रेमाची जाणीव होते, पण त्यामागे दडलेली आत्मा-परमात्म्याच्या मिलनाची अनुभूती समजल्यावर या गाण्याची खोली आणखी वाढते.




