पोलीस भरतीची प्रक्रिया सध्या जोरात सुरू असून, या भरतीसाठी राज्यभरातून हजारो तरुण-तरुणी मोठ्या आशेने सहभागी झाले आहेत. मात्र, या प्रक्रियेदरम्यान बीड जिल्ह्यात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. शारीरिक चाचणीदरम्यान 1600 मीटर धाव पूर्ण करताना एका उमेदवाराचा अचानक मृत्यू झाल्याने पोलीस भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मृत उमेदवाराचे नाव दीपक भास्कर वाव्हाळ (रा. परळी, जि. बीड) असे आहे. पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दीपक परळीहून बीड येथे भरती प्रक्रियेसाठी आला होता. पोलीस भरती अंतर्गत सुरू असलेल्या शारीरिक चाचणीत 1600 मीटर धाव ही महत्त्वाची परीक्षा असते. रणरणत्या उन्हात ही धाव पूर्ण करत असताना दीपकला अचानक चक्कर आली आणि तो धावत असतानाच जमिनीवर कोसळला. घटनेनंतर तत्काळ उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला अन् डॉक्टरांनी दीपकला मृत घोषित केले. या घटनेमुळे भरती केंद्रावर एकच खळबळ उडाली. दीपकच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
सध्या राज्यभरात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून अशा परिस्थितीत 1600 मीटर धावण्याची परीक्षा घेण्यात येत असल्याने उमेदवारांची मोठ्या प्रमाणात दमछाक होत आहे. काही ठिकाणी उमेदवारांना चक्कर येणे, थकवा जाणवणे अशा तक्रारी समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस भरतीदरम्यान आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वेळापत्रकात बदल करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दीपक वाव्हाळच्या मृत्यूमुळे भरती प्रक्रियेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. भविष्यात अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी प्रशासनाने उपाययोजन करण्याची मागणी विविध स्तरातून होत आहे.




