बीड (Beed) जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) परिसरात गुरुवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गडावरील खोल दरीमध्ये दोन पुरुषांचे मृतदेह आढळून आले असून, यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यातील एका मृताचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे, तर दुसरा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना मिळून आला. गडावरील या दुर्गम दरीच्या भागात काही स्थानिक नागरिक सरपण गोळा करण्यासाठी गेले असताना त्यांना मानवी अवशेष दिसून आले. ही माहिती वाऱ्यासारखी गावात पसरल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरी खोल आणि दुर्गम असल्याने पोलिसांना मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठ्या कसरतीचा सामना करावा लागला.
दुसरा मृतदेह दिनकर नाना घडशिंग (वय 65, रा. भिलवाडा, पाथर्डी) या वृद्धाचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, ते भोळसर प्रवृत्तीचे असल्याने किंवा गडावर फिरत असताना रस्ता चुकल्याने त्यांचा पाय घसरून ते दरीत पडले असावेत, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. एकाच वेळी दोन मृतदेह सापडल्याने या घटनेमागे काही घातपात तर नाही ना, या दिशेनेही चर्चा सुरू झाली आहे.




