व्हिटॅमिन-सी आणि नैसर्गिक एन्झाइम्सचा खजिना; जाणून घ्या बटाट्याचा रस लावण्याचे फायदे आणि कोणी टाळावा याचा वापर
उन्हाळ्यातील तीव्र सूर्यप्रकाश, गरम लहरी आणि धुळीमुळे त्वचेवर टॅनिंग येणे ही सामान्य समस्या आहे. वेळीच उपचार न केल्यास हा काळपटपणा वाढत जातो आणि त्वचेची छिद्रे बंद होऊन मुरुमे किंवा पुरळ येतात. अशा वेळी बटाट्याचा रस त्वचेसाठी रामबाण उपाय ठरू शकतो. सुमारे १०० ग्रॅम बटाट्यामध्ये १३ मिग्रॅ व्हिटॅमिन-सी असते, जे त्वचेचा रंग उजळण्यास आणि काळे डाग कमी करण्यास मदत करते. बटाट्यातील नैसर्गिक एन्झाइम्स ‘ब्लिचिंग एजंट’ म्हणून काम करतात, ज्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या उजळते. विशेषतः ज्यांची त्वचा तेलकट आहे, त्यांच्यासाठी बटाट्यातील ‘स्टार्च’ अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
केवळ रंग सुधारण्यासाठीच नाही, तर अँटी-एजिंग आणि मॉइश्चरायझिंगसाठीही बटाट्याचा रस उत्तम आहे. यातील अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सपासून त्वचेचे संरक्षण करतात, ज्यामुळे अकाली येणाऱ्या सुरकुत्या रोखल्या जातात. उन्हाळ्यात आठवड्यातून दोन ते तीन वेळा याचा वापर केल्यास त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकून राहतो. मात्र, हा उपाय करताना काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. ज्यांची त्वचा अत्यंत संवेदनशील (Sensitive Skin) आहे किंवा ज्यांना आधीच खाज आणि जळजळीचा त्रास आहे, त्यांनी बटाट्याचा रस लावणे टाळावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हिरव्या रंगाच्या बटाट्याचा वापर कधीही करू नये, कारण त्यातील ‘सोलानिन’ हे विषारी घटक त्वचेला हानी पोहोचवू शकतात. कोणताही नवीन उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे नेहमीच सुरक्षित ठरते.




