लिपस्टिक, काजळ, ब्रश, मस्करा शेअर केल्याने वाढतो त्वचा व डोळ्यांच्या संसर्गाचा धोका तज्ज्ञांचा गंभीर इशारा
सुंदर दिसण्यासाठी वापरले जाणारे मेकअप प्रॉडक्ट्स जर तुम्ही आई, बहीण, मैत्रीण किंवा मुलीसोबत शेअर करत असाल तर आताच सावध व्हा. कारण ही सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, एकाच मेकअप वस्तू अनेकांनी वापरल्यास बॅक्टेरिया आणि जंतुसंसर्ग वेगाने पसरतो.
महिला व तरुणींमध्ये एकमेकींची लिपस्टिक ट्राय करणे, काजळ, ब्रश (Kajal Brush), पावडर वापरणे किंवा मेकअपसाठी वस्तू उधार देण्याची सवय खूप सामान्य आहे. मात्र काजळ पेन्सिल, आयलाइनर किंवा मस्करा थेट डोळ्यांच्या संपर्कात येत असल्याने संसर्गाचा धोका अधिक वाढतो. समोरच्या व्यक्तीला डोळ्यांचा संसर्ग असल्यास त्याच प्रॉडक्टचा वापर केल्याने डोळ्याला खाज, जळजळ, पाणी येणे आणि सूज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
याचप्रमाणे लिपस्टिक (Lipstick), लिप ग्लॉस (Lip Gloss) आणि फेस पावडर शेअर केल्यामुळे त्वचेवर पुरळ, खाज, लालसरपणा आणि अॅलर्जी होण्याची शक्यता असते. मेकअप ब्रश स्वच्छ नसेल तर त्यातूनही त्वचेचे आजार होऊ शकतात.
अनेक मुली वॅक्सिंगसाठी रेजर किंवा क्रीम देखील एकमेकींसोबत शेअर करतात. मात्र यामुळे त्वचेवर जखमा, फंगल इन्फेक्शन आणि इतर संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला आहे की वैयक्तिक स्वच्छतेसाठी मेकअप किट आणि ब्युटी प्रॉडक्ट्स कोणासोबतही शेअर करू नयेत.




