spot_img

Bangladesh Unrest : Municipal Elections मध्ये BJP जुनाच ‘हिंदू-मुस्लिम’ फार्मूला वापरणार?

spot_img

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका बाजूला मोठी युती आकाराला येताना दिसतेय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन भाऊ एकत्र आल्याने ठाकरे ब्रँडच्या चर्चांनी जोर धरला आहे. हे दोघे भाऊ भाजप आणि शिंदे गटासमोर एक मोठं आव्हान उभं करू शकतात, अस राजकीय जाणकारांच म्हणणं आहे. परंतु, राजकीय वर्तुळात जेव्हा असं एखादं मोठं आव्हान उभं राहतं, तेव्हा जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी काही जुनेच ‘फॉर्म्युले’ वापरले जातात. सध्या महाराष्ट्रात तेच घडताना दिसतंय. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा ‘हिंदू-मुस्लिम’ कार्ड खेळलं जातंय. बांगलादेशात जे काही घडतंय, त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी तसा काहीही संबंध नसताना त्याचा वापर हा मतांच्या ध्रुवीकरणासाठी केला जातोय का?

https://youtu.be/GeydqN0n0pI

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वात जास्त चर्चा कशाची असेल, तर ती म्हणजे ठाकरे बंधूंच्या या ऐतिहासिक युतीची. शिवसेनेतील फुटीनंतर मराठी माणसाच्या मनात एक प्रकारची सहानुभूती उद्धव ठाकरेंबद्दल आहे, तर दुसरीकडे राज ठाकरेंची (Raj Thackeray) आक्रमक शैली आणि वक्तृत्व आजही तरुणांना प्रभावित करतय. हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याने ‘मराठी कार्ड’ पुन्हा एकदा जोमाने चालेल. ही गोष्ट सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. कारण, ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपने शिवसेनेला घेरलं होतं, त्या मुद्द्याला छेद देण्यासाठी ‘मराठी अस्मिता’ हा सर्वात मोठा पर्याय ठरू शकतो. पण या ‘ठाकरे फॅक्टर’ला शह देण्यासाठी काहीतरी वेगळं घडवून आणणं हे भाजपच्या दृष्टीने गरजेचं आहे. आणि नेमकं याच काळात बांगलादेशातील घडामोडींचा उपयोग धार्मिक ध्रुवीकरणासाठी केला जाऊ लागला आहे. एवढच काय तर मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी तर भर सभेत म्हटल की, ‘जर ठाकरेंची सत्ता मुंबई महापालिकेवर आली तर मुंबईचा महापौर खान अर्थात कोणी मुस्लिम होईल, मुंबईचे रस्ते महम्मद अली रोड बनतील.’ यावरून भाजप आता कोणत्या ठरला जात आहे हे लक्षात येतय.

गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सोशल मीडियावर काही धक्कादायक व्हिडिओ पाहिले असतील. बांगलादेशात हिंदू समाज संकटात आहे, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, अशा प्रकारचे हे व्हिडिओ आहेत. यात शंकाच नाही की, जगाच्या पाठीवर कुठेही मानवाधिकारांचे उल्लंघन होत असेल, तर त्याचा निषेध हा झालाच पाहिजे. पण प्रश्न हा आहे की, हे व्हिडिओ अचानक महाराष्ट्रात आणि विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर इतके व्हायरल का केले जात आहेत? महाराष्ट्रासहित देशाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्येही यावरून बंद पुकारला जात आहे, मोर्चे काढले जात आहेत. यामध्ये संघाच्या विश्व हिंदू परिषद व बजरंग दलासारख्या संघटना आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. निवडणूक तज्ज्ञांच्या मते, हे मतदारांच्या मनातील Fear Factor जागृत करण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे. मतदारांच्या समोर बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यापेक्षा, ‘धर्म धोक्यात आहे’ हे मांडणं राजकीयदृष्ट्या जास्त सोयीचं असतं. बांगलादेशातील परिस्थितीचा आधार घेऊन महाराष्ट्रात धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा हा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असल्याचे दिसून येतेय.

तुम्हाला आठवत असेल, जेव्हा भारतात तीन कृषी कायद्यांविरोधात लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमेवर शेतकरी बसले होते. त्यावेळी रिहाना किंवा ग्रेटा थनबर्ग सारख्या आंतरराष्ट्रीय व्यक्तींनी शेतकऱ्यांच्या समर्थनात ट्विट केलं होतं. तेव्हा केंद्रातील भाजप सरकार आणि त्यांच्या समर्थकांनी काय भूमिका घेतली होती? त्यांनी एकच सूर लावला होता की – ‘हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे आणि बाहेरील देशांनी किंवा व्यक्तींनी यात हस्तक्षेप करू नये.’ अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर यांसारख्या मोठ्या सेलिब्रिटींनीही ‘India Together’ आणि ‘Internal Matter’ असे हॅशटॅग वापरून विदेशी लोकांच्या सहानुभूतीला विरोध केला होता.

जर शेतकरी आंदोलन हा भारताचा अंतर्गत प्रश्न होता तर मग आज तोच नियम बांगलादेशला लागू का होत नाही? बांगलादेशात जे काही घडतंय, तो त्या देशाचा अंतर्गत प्रश्न नाही का? जर भारताने शेतकरी आंदोलनावेळी जगाला ‘हस्तक्षेप करू नका’ असं सांगितलं होतं, तर मग आज महाराष्ट्राच्या गल्लीबोळात बांगलादेशच्या नावाने आंदोलनं करणं, घोषणाबाजी करणं आणि त्यावरून इथल्या दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणं, हा दुटप्पीपणा नाही का? जेव्हा सरकारला सोयीचं असतं, तेव्हा तो ‘अंतर्गत प्रश्न’ असतो आणि जेव्हा निवडणुका जिंकायच्या असतात, तेव्हा शेजारच्या देशातील प्रश्न आपला ‘धार्मिक मुद्दा’ बनतो. हेच आजच्या राजकारणाचं विदारक वास्तव आहे.

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न – या सगळ्याचा फायदा कोणाला? महाराष्ट्रात आगामी काळात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक यांसारख्या मोठ्या महापालिकांच्या निवडणुका आहेत. मुंबई महापालिका तर देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे आणि तिथे उद्धव ठाकरेंचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. जेव्हा विकासकामांवर किंवा भ्रष्टाचारावर चर्चा होते, तेव्हा सत्ताधाऱ्यांना उत्तर देणं कठीण जातं. पण जेव्हा चर्चा ‘हिंदू-मुस्लिम’ किंवा ‘बाहेरच्या देशातील अत्याचार’ यावर वळते, तेव्हा लोकांच्या भावनांना हात घालून मतदान मिळवणं सोपं होतं. बांगलादेशातील परिस्थितीचा वापर करून महाराष्ट्रातील हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुस्लिम विरोध हा प्रचाराचा मुद्दा बनवून SC,ST, OBC मतांचे ध्रुवीकर करण्याचाच हा प्रकार आहे. जेणेकरून, महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ विरुद्ध ‘अमराठी’ किंवा ‘विकास’ विरुद्ध ‘भ्रष्टाचार’ या मुद्द्यांऐवजी केवळ ‘धार्मिक ओळख’ यावर मतदान होईल.

राजकारण हे नेहमीच संधीसाधू असतं. पण एक नागरिक म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की, आपले खरे प्रश्न काय आहेत? आपले प्रश्न महागाई आहे, आपल्या मुलांचे शिक्षण आणि नोकऱ्या आहेत, बंद पडल्या जाणाऱ्या मराठी शाळा आहेत, आपल्या शेत मालाला न मिळणारा हमीभाव आहे. बांगलादेशातील हिंसाचाराचा निषेध नक्कीच झाला पाहिजे, पण त्यावरून आपल्याच राज्यात शांतता भंग होणार नाही याची काळजी देखील घेतली पाहिजे. सोशल मीडियावर येणारे प्रत्येक व्हिडिओ खरे नसतात, अनेकदा ते जुने किंवा चुकीच्या संदर्भाने पसरवले जातात याचे नेहमीच भान ठेवले पाहिजे. जर आपण धार्मिक ध्रुवीकरणाच्या जाळ्यात अडकलो, तर आपण आपले मूळ प्रश्न विचारणं विसरून जाऊ. आणि सत्ताधाऱ्यांना नेमकी हीच गोष्ट हवी असते. तुम्हाला या विषयावर काय वाटतं? बांगलादेशचा मुद्दा महाराष्ट्राच्या निवडणुकीत खरोखर प्रभाव टाकेल का? की यावेळी महाराष्ट्र विकासाच्या आणि अस्मितेच्या मुद्द्यावर मतदान करेल?

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ