महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांचे खुले पत्र; ठाकरे बंधूंच्या एकतेवर भर
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. २९ महापालिकांसाठी होत असलेल्या या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांची धग वाढली असतानाच, मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी थेट जनतेला उद्देशून एक भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी मराठी मतदारांना मतदानासाठी जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे.
नांदगावकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “मी मनसेचा नेता म्हणून नव्हे, तर तुमचा आपला बाळा म्हणून हात जोडून सांगतो—मराठी माणसा जागा हो! रात्र वैऱ्याची आहे. मुंबई आपली आहे.” मुंबईवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस आपलाच असल्याचे सांगत त्यांनी ही निवडणूक केवळ उमेदवारांची नसून मराठी अस्मितेची असल्याचे ठामपणे मांडले.
पक्ष वेगळे असले तरी मराठी अस्मिता एकच असल्याचे सांगत त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा अधोरेखित केला. ठाकरे बंधू एकत्र येणे ही काळाची गरज असून, ही एकता राजकीय गणितापेक्षा मोठी असल्याचे त्यांनी नमूद केले. “ही फक्त युती नाही, तर मराठी माणसाच्या स्वाभिमानाची लढाई आहे,” असे त्यांनी म्हटले.
नांदगावकर यांनी आठवण करून दिली की, उपचारादरम्यान बाळासाहेब ठाकरे यांनी दोन भावांना एकत्र आणण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज मराठी माणसाच्या इच्छेने आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीने तो शब्द पूर्ण झाला असल्याचा दावा त्यांनी केला. ठाकरे बंधू एकत्र उभे राहणे ही मुंबई आणि महाराष्ट्रासाठी महत्त्वाची घडामोड असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची युती मैदानात उतरली असून, २२७ उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांनी ईव्हीएमवर इंजिन, मशाल किंवा तुतारी या चिन्हांसमोर बटण दाबून युतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
“ही लढाई सत्तेची नाही, तर मराठी माणसाच्या अस्तित्वाची, स्वाभिमानाची आणि भविष्यातील मुंबईची आहे,” असे सांगत नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना घराघरात जाऊन मतदार जागृती करण्याचे आवाहन केले. शेवटी “जय महाराष्ट्र”च्या घोषात त्यांनी आपल्या पत्राचा समारोप केला.
दरम्यान, या पत्रामुळे ठाकरे बंधूंच्या एकतेचा संदेश अधिक ठळकपणे समोर आला असून, मतदानाच्या तोंडावर या भावनिक आवाहनाचा मतदारांवर किती प्रभाव पडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




