शाई, मशीन आणि प्रशासनावर गंभीर आरोप; दुबार मतदान रोखण्यासाठी ‘भगवा गार्ड’ रस्त्यावर
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मतदान प्रक्रियेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत मराठी मतदारांसोबतच इतर भाषिक नागरिकही मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडत असल्याचे त्यांनी सांगितले. “मुंबई सुरक्षित आणि सक्षम ठेवायची असेल, तर ठाकरेंशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, या भावनेतूनच नागरिक मतदान करत आहेत. हे चित्र पाहून समाधान वाटत आहे,” असे ते म्हणाले.
मतदानानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई सहजपणे पुसता येत असल्याचे प्रकार समोर येत असताना, नांदगावकर यांनी या मुद्द्यावर गंभीर चिंता व्यक्त केली. “लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास हळूहळू कमी होत चालला आहे. सत्ताधारी सरकार आपल्या सोयीसाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत असल्याचा संशय निर्माण होत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या यंत्रणांवरही नांदगावकर यांनी प्रश्न उपस्थित केले. “व्हीव्हीपॅट मशीन काढून टाकून अचानक नवीन ‘पाडू मशीन’ का आणण्यात आलं, हेच कळत नाही. कालच्या घडीला या मशीनची गरज काय होती? मतदान आपल्या बाजूने कसं होईल, यासाठी लपूनछपून खेळी केली जात आहे. त्यामुळेच लोकांचा या प्रक्रियेवरचा विश्वास उडत आहे,” असे ते म्हणाले. मात्र, “या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवरही ठाकरे बंधू महापालिकांवर सत्ता मिळवतील, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे,” असा दावा त्यांनी केला.
दुबार मतदान रोखण्यासाठी मनसेकडून ‘भगवा गार्ड’ तैनात करण्यात आल्याबाबत बोलताना नांदगावकर म्हणाले, “प्रशासनाने कितीही आडकाठी केली तरी त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडावे. आम्ही आमचे काम करत आहोत.” यंत्रणा आणि अधिकाऱ्यांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. “तुम्ही चुकीच्या पद्धती वापरणार आणि आम्ही गप्प बसायचं का? आमची फौज सज्ज आहे. दुबार मतदान करणारे आढळले तर त्यांना रोखल्याशिवाय आम्ही राहणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही निवडणूक प्रक्रियेवर जोरदार टीका केली. “आमच्या परीने जे काही शक्य आहे ते आम्ही करत आहोत. मात्र, हे लोकशाहीसाठी चांगले लक्षण नाही. अशा पद्धतीच्या निवडणुका आणि फसवणुकीतून सत्ता मिळवणे, याला निवडणूक म्हणता येणार नाही. सत्तेचा गैरवापर करण्यालाही काही मर्यादा असायला हव्यात,” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.




