बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले, जिथे शेतकऱ्यांच्या दुःखदायी अवस्थेवर प्रकाश टाकला गेला. या परिषदेला प्रहार संघटनेचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आणि तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.कडू म्हणाले, “शेतकऱ्याला विचारले तर त्याला काहीच येत नाही असे तो सांगतो, मग तो आत्महत्या का करतो? आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला संपवा, असे करा तर सरकार गुढगे टेकेल.” त्यांनी शेतकऱ्यांना जाती-धर्माच्या भिंती तोडून एकत्र येण्याचे आवाहन केले आणि सांगितले की, सोयाबीनला कमी भाव मिळत असेल तर शेतकऱ्यांनी बांगड्या घालाव्यात. ते पुढे म्हणाले, “दिवाळीच्या सणातही ही दुःखाची सभा घ्यावी लागते, कारण तुम्ही विचारांची लढाई सोडून जातीची भांडणे सुरू केलीत, त्यामुळे शेतकरी मागे पडला.”परिषदेत दीपक केदार यांनीही सरकारला शेतकऱ्यांच्या अधोगतीचे मुख्य दोषी ठरवले.
बच्चू कडू यांनी शरद जोशी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar ) यांच्या लढ्याची आठवण करून दिली आणि सांगितले, “शरद जोशींनी लाखांची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी लढले, पण शेतकऱ्यांनीच त्यांना पाडले. मीही जातीत बसलो नाही म्हणून मला पाडले. सरकारने शेतकऱ्यांना भगवा, हिरवा, निळा अशा रंगांत विभागले आणि लुटले.”लोकसभा निवडणुकीत कापूस-सोयाबीनच्या भावाची मागणी न करता जाती पाहिल्याचा आरोप करत कडू म्हणाले, “सर्व जाती मातीमुळेच जगतात, शेतकरी सर्वत्र आहे. आमची मेहनत सर्वाधिक, पण लुटणारे हे सरकार डुक्करासारखे आहे. शहरातील आमदार हप्ते गोळा करून सुखी, पण शेतकऱ्यांचा आमदार परवडत नाही. तुमचा बैलही चांगला, त्याला तरी लाथ मारता येते.
मालाला भाव मिळाला तर गाव सुखी होईल, आरक्षणाने फक्त कुटुंब.”मोदी सरकारने अमेरिकेतून लाखो कापूस गाठी मागवल्याची टीका करत ते म्हणाले, “मीडियाचे अर्धे मालक भाजपचे, म्हणून बातमी दिसत नाही. गाव गरीब राहिले तरच शहर श्रीमंत. पंजाबच्या शेतकऱ्यांनी १३ महिने लढून कायदे रद्द करवले, आम्ही मात्र घरी परततो. शेतातील मेहनतेचा एक टक्काही आंदोलनात करा, सगळे झेंडे घेऊन लढा तर सुख येईल.” २८ तारखेला नागपूरला मोर्चाची घोषणा करत त्यांनी शेतकऱ्यांना लढण्याचा निर्धार व्यक्त केला. ही परिषद शेतकऱ्यांच्या एकजुटीची गरज अधोरेखित करणारी ठरली.




