मुलांच्या मानसिक आरोग्य आणि विकासासाठी घेण्यात आला निर्णय
लाहानपणीपासूनच मुलांच्या हातात फोन दिला जातो. मुले लहान वयातच इंटरनेटचा वापर करु लागली आहेत. युनायटेड नेशन्सच्या आकडेवारीनुसार, जगातील प्रत्येक अर्ध्या सेकंदाला एक मूल ऑनलाइन जगात प्रवेश करत आहे. याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर आणि विकासावर परिणाम होत आहे. अशामध्ये आता अनेक देश सोशल मीडिया आणि त्यासंबधित सायबर सुरक्षेसाठी कठोरात कठोर पाऊले उचलताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलिया (Australia)
सरकारने मुलांच्या ऑनलाइन सुरक्षिततेला बळकटी देण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. आता 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही मुलाला सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्म वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. स्वतः देशाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे आता एकीकडे कौतुकाचा वर्षाव होत आहे तर काहीजण सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत आहेत. 16 वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या मुलांना सोशल मीडिया वापरण्यास मनाई करणारा कायदा डिसेंबर 2025 पासून लागू होणार आहे. यानंतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेला मुलगा किंवा मुलगी अकाऊंट उघडू शकत नाही किंवा जुनं अकाऊंट सुरु ठेवू शकणार नाही.
ऑस्ट्रेलियन सरकारच्या निर्णयानुसार हा नियम सर्व मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लागू असेल. यात फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक, स्नॅपचॅट, एक्स, यूट्यूब, रेडिट, आणि किक यावर देखील हा निर्णय लागू असेल. ऑस्ट्रेलियातील कोणताही 16 वर्ष पूर्ण नसलेला मुलगा किंवा मुलगी खातं उघडू शकणार नाही. 16 वर्ष पूर्ण नसलेल्यांची खाती बंद करावी लागतील. याशिवाय वयाची पडताळणी करण्यासाठी नवी यंत्रणा सुरु करावी लागेल.ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी म्हटलं की हा कायदा लहान मुलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे. हे पाऊल आमच्या मुलांना ऑनलाईन सुरक्षित ठेवण्यासाठी उचललं आहे. डिजीटल विश्व मुलांच्या मानसिक आरोग्य आणि त्यांच्या विकासाच्या किमतीवर चालू शकत नाही. इंटरनेट मुलांच्या शिक्षणाचं आणि मनोरंजनाचं साधन असावं मात्र मुलांच्या आरोग्यास धोकादायक ठरु नये, असं अँथनी अल्बनीज (Anthony Albanese) म्हणाले.




