‘अस्सी’च्या प्रमोशनदरम्यान वाढत्या बलात्कार प्रकरणांवर तापसीची तीव्र चिंता; समाज आणि संगोपन व्यवस्थेवर बोट
अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsee Panu) सध्या तिच्या आगामी ‘अस्सी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रचारादरम्यान तापसीने देशात वाढत चाललेल्या बलात्काराच्या घटनांवर स्पष्ट आणि परखड मत मांडलं. विशेषतः अल्पवयीन मुलांचाही अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग दिसत असल्याने समाज म्हणून आपण कुठेतरी चुकतोय, अशी खंत तिने व्यक्त केली.
‘अस्सी’च्या प्रमोशनसाठी तापसी जयपूरमध्ये उपस्थित होती. यावेळी चित्रपटाच्या विषयावर बोलताना तिने समाजातील वाढत्या अमानवी घटनांकडे लक्ष वेधलं. “बलात्कारासारख्या जघन्य गुन्ह्यांकडे लोक आता एक सामान्य बातमी म्हणून पाहू लागले आहेत, ही गोष्ट अत्यंत धोकादायक आहे,” असं ती म्हणाली.
तापसी पुढे म्हणाली, “देशात दररोज सरासरी ८० बलात्काराच्या घटना नोंदवल्या जातात. मी दिल्लीची असल्याने अशा बातम्या रोज वाचते. पण धक्कादायक बाब म्हणजे लोकांचा या गुन्ह्यांबाबतचा संवेदनशीलपणा कमी होत चालला आहे. बलात्काराकडे चोरीसारख्या गुन्ह्याप्रमाणे पाहिलं जातंय. हे पाहून मला प्रचंड राग येतो. ही परिस्थिती सहन करण्याच्या पलीकडे गेली आहे.”
एका अलीकडील घटनेचा उल्लेख करत तापसी म्हणाली, “काही दिवसांपूर्वी सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची बातमी समोर आली. त्यातील आरोपी १० ते १३ वयोगटातील मुलं होती. हे अत्यंत धक्कादायक आहे. अशा घटना का घडतात, याचा विचार करायला भाग पाडणारा चित्रपट म्हणजे ‘अस्सी’. हा चित्रपट पाहताना प्रेक्षक न्यायाधीशाच्या भूमिकेत जातील आणि स्वतःला प्रश्न विचारतील—आपण काय न्याय देणार आहोत?”
ती पुढे म्हणाली, “जर १० वर्षांचा मुलगा बलात्कारासारख्या गुन्ह्यात सामील असेल, तर त्यामागची कारणं शोधणं गरजेचं आहे. कुठेतरी मुलांचं संगोपन चुकीच्या दिशेने होत आहे. याची सुरुवात घरापासून करावी लागेल. आपल्या मुलांना योग्य मूल्यं, संवेदनशीलता आणि जबाबदारी शिकवणं ही आपली जबाबदारी आहे.”
अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘अस्सी’ हा चित्रपट समाज आणि यंत्रणांवर थेट प्रश्न उपस्थित करतो. यापूर्वी ‘मुल्क’, ‘थप्पड’ आणि ‘आर्टिकल 15’सारखे सामाजिक भाष्य करणारे चित्रपट देणाऱ्या अनुभव सिन्हांचा हा आणखी एक विचारप्रवर्तक प्रयत्न आहे.
‘अस्सी’ चित्रपटात तापसी पन्नूसह कानी कुसृती, रेवती, कुमुद मिश्रा, झीशान अयूब, नसीरुद्दीन शाह, सुप्रिया पाठक आणि सीमा पाहवा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २० फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.




