spot_img

Aslam Chaudhry In Dhurandhara : पाकिस्तानचा ‘सुपरकॉप’ चौधरी असलम कोण होता?

spot_img

गँगस्टर्सचा खात्मा, वादग्रस्त एनकाउंटर आणि आत्मघाती हल्ल्यात अंत—ल्यारीचा थरारक इतिहास

पाकिस्तानमधील ल्यारी परिसरावर आधारित धुरंधर चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली आहे. अक्षय खन्ना, रणवीर सिंह आणि संजय दत्त यांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपट चर्चेत आहे. विशेषतः संजय दत्त यांनी साकारलेली पाकिस्तानच्या ‘सुपरकॉप’ चौधरी असलमची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. पण हा चित्रपट ज्या व्यक्तिमत्त्वावर आधारित आहे, त्याची खरी कहाणी अधिकच थरारक आणि वादग्रस्त आहे.

चौधरी असलम हे सिंध पोलिस दलात एसपी पदावर कार्यरत होते. कराची आणि आसपासच्या भागात गँगस्टर राज असताना, गुन्हेगारी मोडून काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्या काळात अरशद पप्पू, रहमान डकैतसारख्या कुख्यात गुंडांची दहशत होती. असलम यांनी अनेक मोठ्या गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई केली. रहमान डकैतचा एनकाउंटर हा त्यातील सर्वात गाजलेला प्रकार मानला जातो.

पांढरा पठाणी कुर्ता, हातात सिगारेट आणि निर्भय वावर—चौधरी असलम यांची प्रतिमा एखाद्या चित्रपटातील नायकासारखीच होती. मात्र, याच शैलीमुळे ते वादातही सापडले. कोणतीही सखोल चौकशी न करता थेट एनकाउंटर केल्याचे, तसेच बनावट चकमकींचे आरोप त्यांच्यावर झाले. तरीही, वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून त्यांचा ‘हत्यार’ म्हणून वापर होत राहिला.

जानेवारी २०१४ मध्ये हीच आक्रमक कारवाई त्यांच्या जीवावर बेतली. ल्यारी एक्सप्रेसवेवर प्रवास करत असताना आत्मघाती बॉम्बहल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली गाडी त्यांच्या ताफ्यावर आदळली. स्फोट इतका भीषण होता की असलम यांच्या गाडीचे अक्षरशः तुकडे झाले आणि त्यांचे अवशेषही सापडले नाहीत. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबानने स्वीकारली. टीटीपीच्या लढवय्यांवर केलेल्या कारवाईचा हा बदला असल्याचे सांगण्यात आले.

उल्लेखनीय म्हणजे, चौधरी असलम यांच्यावर याआधीही अनेक वेळा हल्ल्याचे प्रयत्न झाले होते. अखेर २०१४ मधील आत्मघाती स्फोटात पाकिस्तानच्या या वादग्रस्त पण प्रभावशाली ‘सुपरकॉप’चा अंत झाला. धुरंधरमुळे ही कहाणी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ