राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात महत्त्वाची मानली जाणारी मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाची जबाबदारी आता अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शासनाने अधिकृत परिपत्रक जारी करत त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली असून त्या आजच पदभार स्वीकारणार आहेत. विशेष म्हणजे, या नियुक्तीसह भिडे या मुंबई महापालिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिडे यांना ‘मेट्रो वूमन’ म्हणूनही प्रसिद्धी मिळाली आहे. नियुक्तीपूर्वी त्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या.
1995 बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या भिडे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांनी सुरुवातीला कोल्हापूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर सिंधुदुर्ग आणि नागपूर जिल्हा परिषदांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
तसेच, अतिरिक्त विभागीय आयुक्त, राज्यपालांचे संयुक्त सचिव, तसेच मुंबई महानगर विकास प्राधिकरण येथे अतिरिक्त आयुक्त अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या सचिव म्हणूनही त्यांनी योगदान दिले.
2015 मध्ये मुंबई मेट्रो लाईन 3 प्रकल्पाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी या प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावत ‘मेट्रो वूमन’ अशी ओळख निर्माण केली.
दरम्यान, या पदासाठी असिम गुप्ता यांचे नावही चर्चेत होते. मात्र अखेरीस भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांच्या अनुभव आणि नेतृत्वामुळे मुंबई महापालिकेच्या कामकाजात नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




