दहावी नापास, गॅस टाकी चोरणारा भोंदू निघाला भाजपचा प्रचारक? संजय राऊतांच्या खळबळजनक आरोपांनी नाशिकमध्ये राजकीय भूकंप
नाशिकचा स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्या पाशवी कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, आता त्याच्या जवळच्या व्यक्तीनेच या भोंदूगिरीचा कच्चा चिट्ठा उघड केला आहे. खरातच्या परिचयातील राजेंद्र खताळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरात हा कोणताही लष्करी अधिकारी नसून तो चक्क दहावी नापास आहे. घर सोडून पळाल्यानंतर त्याने एका एसटीडी बूथपासून आपल्या प्रवासाला सुरुवात केली, जिथे तो लोकांची फसवणूक करू लागला. प्लॉटींगचा व्यवसाय, लग्ने जुळवणे आणि त्यानंतर ज्योतिषाचा आधार घेत त्याने भोंदूगिरीचे जाळे पसरवले. इतकेच नाही तर त्याच्यावर पूर्वी गॅस टाकी चोरीसारखे गुन्हे असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली असून, आतापर्यंत लैंगिक छळ आणि नरबळीसारख्या गंभीर आरोपांखाली त्याच्यावर ७ गुन्हे दाखल झाले आहेत.
या प्रकरणाने आता मोठे राजकीय वळण घेतले आहे. खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री आणि भाजपवर निशाणा साधला आहे. “खरात हा भाजपचा सक्रिय प्रचारक होता आणि निवडणूक काळात भक्तांच्या माध्यमातून मते मिळवून देण्यासाठी काम करत होता,” असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. गुन्हेगारी कृत्यांची माहिती असूनही सरकारने एका महिलेच्या तक्रारीची वाट का पाहिली, असा सवाल करत त्यांनी नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भोंदूगिरीतून कोट्यवधींची संपत्ती जमवणाऱ्या या ‘कॅप्टन’चे राजकीय लागेबंधे उघड झाल्याने आता या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून, संपूर्ण राज्यातून खरातला कठोर फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.




