मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘ग्रीन सिग्नल’ आणि ५ पथकांचा गनिमी कावा; ५८ पॉर्न क्लिप्ससह हायप्रोफाईल आरोपी जेरबंद
स्वतःला भविष्यवक्ता आणि कॉस्मोलॉजी तज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात याच्या अटकेमागे महाराष्ट्र पोलिसांचे अत्यंत गोपनीय आणि सुनियोजित नियोजन होते. या प्रकरणाचे गांभीर्य आणि खरातचे राजकीय-प्रशासकीय संबंध लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यानंतर हे ऑपरेशन सुरू झाले. ही कारवाई इतकी गुप्त होती की, सुरुवातीला तक्रारीच्या ड्राफ्टमध्ये खरातचे नावही लिहिण्यात आले नव्हते, जेणेकरून बातमी लीक होऊ नये. पाच वेगवेगळ्या पथकांना पाचारण करण्यात आले होते, परंतु त्यापैकी कोणालाही पूर्ण प्लॅनची कल्पना नव्हती; प्रत्येकाकडे फक्त त्यांच्या वाटणीचे काम सोपवण्यात आले होते.
खरातच्या घराजवळ सिव्हिल ड्रेसमधील पोलिसांनी दिवसभर पाळत ठेवली. पोलिसांनी घरात प्रवेश करण्यासाठी एक शिताफीची चाल खेळली— “परिसरात चोर घुसला आहे” असा बहाणा करून पोलिसांनी खरातच्या घरात प्रवेश मिळवला. एकदा आत शिरल्यावर क्राईम ब्रँच आणि गुंडा स्कॉडच्या टीमने घराचा ताबा घेतला. याच शोधमोहिमेदरम्यान पोलिसांच्या हाती तो महत्त्वाचा पेनड्राइव्ह लागला, ज्यामध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले. खरात घरात असल्याची खात्री पटताच वरिष्ठांना कोड लँग्वेजमध्ये संदेश पाठवून त्याला ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर खरातच्या समर्थकांनी आणि काही प्रभावशाली व्यक्तींनी पोलिसांवर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता या ‘हायप्रोफाईल’ नराधमाला न्यायालयासमोर हजर केले.




