पतीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार’; कॅप्टन अशोक खरातच्या पाशवी कृत्याने महाराष्ट्र हादरला
स्वत:ला धार्मिक नेता आणि ज्योतिषी म्हणवून घेणारा ६७ वर्षीय कॅप्टन अशोक खरात याच्या अटकेनंतर आता अत्यंत संतापजनक माहिती समोर येत आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाल येथील एका ट्रस्टचा अध्यक्ष असलेल्या या भोंदू बाबाने ‘दैवी शक्ती’ आणि ‘अंधश्रद्धेचा’ आधार घेऊन एका महिलेचे अनेक वर्ष लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, २०१९ पासून सुरू झालेला हा त्रासाचा सिलसिला २०२५ पर्यंत सुरू होता. लग्नातील अडथळे दूर करण्याच्या बहाण्याने बाबाने महिलेला आपल्या जाळ्यात ओढले आणि लग्नानंतरही तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
पोलिसांनी या प्रकरणात मोठी कारवाई करत खरात याच्या घरातून एक पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि पेनड्राईव्ह जप्त केला आहे. विशेष म्हणजे, या पेनड्राईव्हमध्ये महिलांशी संबंधित तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले असून, यामध्ये अनेक बडे राजकारणी आणि सेलिब्रिटींचे धागेदोरे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका सुन्न करणाऱ्या खुलाशानुसार, बाबाने महिलेला गुंगीचे औषध देऊन पहिल्यांदा अत्याचार केले आणि त्यानंतर तिचे शरीर सुन्न पडल्याचा फायदा घेत हा घाणेरडा प्रकार सुरू ठेवला. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या रॅकेटमध्ये अजून किती जण अडकले आहेत, याचा शोध घेत आहेत.




