महाराष्ट्रात सध्या एकाच नावाची चर्चा आहे आणि ते नाव म्हणजे स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणारा भोंदू बाबा अशोक खरात! ज्याने स्वतःला देवाचा अवतार घोषित केलं, ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली शेकडो महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आज तोच अशोक खरात पोलिसांच्या तावडीत असून त्याच्या पापाचा घडा आता भरला आहे, अशी चर्चा सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या SIT चौकशीत अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत ज्या ऐकून तुमचेही पाय जमिनीखालून सरकतील. अशोक खरातचा काल व्हायरल झालेला तो व्हिडिओ, ज्यामध्ये त्याला नीट चालताही येत नाहीये… त्यामागील सत्य काय? त्याच्या ऑफिस बॉयने पोलिसांना नक्की काय सांगितलं? आणि 1500 कोटींच्या साम्राज्याचा पर्दाफाश कसा झाला?
गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसतोय तो म्हणजे एकेकाळी दिमाखात वावरणारा अशोक खरात. पण आज त्याची अवस्था पाहण्यासारखी झाली आहे. पोलिसांनी त्याला एका अज्ञात स्थळी नेऊन चौकशी केली आणि त्यानंतर जेव्हा तो बाहेर आला, तेव्हा त्याला दोन पोलिसांचा आधार घेऊन चालावं लागत होतं. नेटकरी म्हणतात की, “पोलिसांनी त्याला चांगलाच प्रसाद दिला आहे!” पण काय आहे यामागचं सत्य? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरात तपासात अजिबात सहकार्य करत नव्हता. तो पोलिसांनाच शाप देण्यापर्यंत गेला होता. “माझ्यावर हात टाकाल तर तुमचा कोप होईल,” असं म्हणणाऱ्या खरातला जेव्हा ‘खाकी वर्दी’ची ताकद समजली, तेव्हा त्याचे सर्व अहंकार गळून पडले. ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ अस म्हणत खरात चालताना दिसत आहे. सात-सात तास चाललेल्या या मॅरेथॉन चौकशीत खरात पुरता कोलमडून गेला आहे. अज्ञात स्थळी नेऊन केलेली चौकशी ही तपासाचा एक भाग होती, जिथे त्याला अनेक पुराव्यांशी समोरासमोर उभं केलं गेलं.
अशोक खरात हा केवळ अंधश्रद्धाच पसरवत नव्हता, तर त्याने फसवणुकीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि साहित्याचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. तो मंदिर परिसरात बनावट साप ठेवत. हा साप रिमोटच्या साहाय्याने हलवून तो भाविकांना साक्षात ईश्वरी संकेत असल्याचे भासवायचा. या भीतीपोटी अनेक भाविक त्याच्या चरणी शरण येत. त्यासोबतच दहशत निर्माण करण्यासाठी आणि स्वतःकडे अघोरी शक्ती असल्याचे दाखवण्यासाठी तो नकली वाघाच्या कातड्याचा वापर करत होता. मंदिर परिसरात अशा वस्तू ठेवून तो तिथले वातावरण गूढ आणि भीतीदायक बनवायचा. सोबतच त्याने Hypnotism कलेचा गैरवापर केल्याचीही धक्कादायक बाब समोर आली आहे. ही कला वापरुन तो लोकांच्या मनावर ताबा मिळवायचा. एकदा का व्यक्ती त्याच्या प्रभावाखाली आली की, अघोरी विधींच्या नावाखाली तो त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळायचा. खरातची आर्थिक फसवणूक करण्याची पद्धत अत्यंत चपखल होती. तो बाजारात सहज आणि स्वस्त मिळणारे रानटी चिंचोके पॉलिश करून ते अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारिक असल्याचे सांगायचा. ज्या वस्तूची किंमत 100 रुपयेही नसेल, ती वस्तू तो 1 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत विकायचा. याशिवाय, काचेचे तुकडे आणि साधे खडे दैवी रत्ने असल्याचे सांगून त्याने भाविकांची मोठी आर्थिक लूट केली असल्याचे तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणात हस्तक्षेप करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली Special Investigation Team स्थापन केली. पहिल्या दिवशी सात तास आणि दुसऱ्या दिवशीची अज्ञात स्थळावरील चौकशी… यातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या. अशोक खरातकडे केवळ आश्रमच नाही, तर नाशिक, सिन्नर, शिर्डी आणि वावी परिसरात शेकडो एकर जमीन असल्याचं समोर आलं आहे. तब्बल 52 सातबाऱ्यांवर त्याचं नाव आढळलं असून त्याच्या मालमत्तेची एकूण किंमत 1500 कोटींच्या घरात असल्याचा संशय आहे. खरात केवळ ज्योतिष सांगत नव्हता, तर उपचाराच्या नावाखाली अघोरी प्रकार करायचा. एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात तो एका अल्पवयीन मुलीच्या पोटावर ‘इंटरनेट केबल टेस्टर’ फिरवून उपचार करण्याचा बनाव करत आहे. हे पाहून कोणाचंही डोकं सुन्न होईल. धक्कादायक बाब म्हणजे हे कृत्य तो त्या मुलीच्या आईसमोरच करताना दिसत आहे. कालपर्यंत खरातच्या बाबतीत सांगितल जात होतं की त्याच्या एका पेंड्रिवमध्ये 58 व्हिडिओ आहेत, मात्र दोन दिवसांपासून सुरू असलेल्या तपासात पोलिसांच्या हाती खरातचे 100 हून अधिक व्हिडिओ लागले आहेत, ज्यात तो महिलांचे लैंगिक शोषण करताना दिसत आहे. यातील अनेक व्हिडिओ त्याने स्वतःच रेकॉर्ड केले होते, जे आता त्याच्या विरुद्ध सर्वात मोठा पुरावा ठरत आहेत.
नीरज जाधव हा खरातच्या नाशिकमधील ‘ओकस प्रॉपर्टी’ कार्यालयात काम करायचा. पण खरातच्या पापाचा घडा भरला आणि नीरजने खरातच्या लॅपटॉपमधून सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि आक्षेपार्ह व्हिडिओ चोरले. काल पोलिसांनी नीरज जाधवचीही कसून चौकशी केली. नीरजने हे व्हिडिओ केवळ पोलिसांना देण्यासाठी काढले नव्हते, तर त्याने खरातलाच 5 कोटी रुपयांची मागणी करून ब्लॅकमेल केल्याचाही आरोप आहे. पोलिसांनी नीरजकडून एक मोबाईल हस्तगत केला आहे, ज्यामध्ये तब्बल 40 महिलांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. या महिला खरातच्या संपर्कात होत्या. आता या महिलांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. नीरजने चौकशीत खरातच्या दरबारात येणाऱ्या अनेक बड्या नेत्यांची आणि सेलिब्रिटींची नावे घेतल्याचे समजते. खरातला कोणाचा वरदहस्त होता, हे आता नीरजच्या साक्षीमुळे स्पष्ट होणार आहे.
अशोक खरात प्रकरणात केवळ धार्मिकच नाही, तर राजकीय भूकंपही झाला आहे. खरातच्या ‘शिवनिका संस्थान’वर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर या ट्रस्टी होत्या, अशी माहिती समोर आल्यावर त्यांच्यावर तीव्र शब्दात टीका झाली. शेवटी चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. चाकणकर यांनी स्पष्ट केलं की त्यांचा कार्यकाळ गेल्या वर्षीच संपला असून त्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही. मात्र त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होते, त्यामुळे लोकांची नाराजी व्यक्त होत होती. चाकणकरांनी स्पष्टीकरण देत आपले हैट वर केले असले तरीही, SIT आता या संस्थानच्या सर्व जुन्या आणि नव्या ट्रस्टींची चौकशी करणार आहे. पैशांचे व्यवहार आणि जमिनींचे व्यवहार कशा प्रकारे झाले, याचा तपास आता वेगाने सुरू आहे.
अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत आहे. ज्या पद्धतीने SIT ने फास आवळला आहे, ते पाहता खरातचे पुढचे अनेक वर्ष तुरुंगात जाणार हे निश्चित आहे. इन्कम टॅक्स विभाग आता त्याच्या 1500 कोटींच्या संपत्तीचा तपास करणार आहे. विचार करण्याची गोष्ट ही आहे की, सुशिक्षित समाजातही लोक अशा भोंदू बाबांच्या नादी कसे लागतात? केबल टेस्टरने पोटावर उपचार करणारा माणूस ‘देव’ कसा असू शकतो? अशोक खरातचे हे प्रकरण म्हणजे अंधश्रद्धेचा एक भयानक चेहरा आहे. पोलिसांनी त्याला दिलेला ‘प्रसाद’ हा केवळ सुरुवातीचा भाग आहे, खऱ्या चौकशीतून अजून बरेच चेहरे समोर येतील अशी अपेक्षा आहे, मात्र गेल्या काही SIT च्या चौकशींचा अभ्यास केला तर त्या चौकशींचे पुढे काहीच होत नाही असे दिसते. त्यामुळे या चौकशीतून तरी काही निष्पन्न होईल काय असे प्रश्न आता विचारले जात आहेत.




