माजी आमदारांच्या गल्लीत ५ कोटींचा आलिशान बंगला; बड्या राजकीय नेत्यांच्या ‘चोरपावलांनी’ होणाऱ्या भेटींनी नाशिकमध्ये खळबळ
स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात याच्या पापकर्मांचा पाढा आता वाचला जाऊ लागला आहे. नाशिकच्या एका उच्चभ्रू वस्तीत, जिथे तीन माजी आमदारांचे वास्तव्य आहे, तिथेच खरातने २०१२ मध्ये ‘तृप्तबाला’ नावाचा पाच कोटींचा भव्य महाल उभारला होता. मात्र, हा बंगला केवळ वैभवाचे प्रतीक नसून लैंगिक अत्याचार आणि काळ्या कृत्यांचा अड्डा असल्याचे आता समोर येत आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमावस्येच्या रात्री या बंगल्याचे रूप पूर्णपणे पालटायचे. रात्रीच्या काळोखात अनेक बडे राजकीय नेते आणि उच्चपदस्थ अधिकारी आपल्या महागड्या गाड्यांमधून चोरट्या मार्गाने या बंगल्यात हजेरी लावायचे. या ‘गुप्त दरबारात’ नक्की काय शिजायचे, याची चर्चा आता संपूर्ण शहरात रंगली आहे.
खरातने आपल्या गुन्ह्यांभोवती केवळ सिमेंटच्या भिंतीच नाही, तर दहशतीचे एक अभेद्य कवचही उभे केले होते. बंगल्याच्या सुरक्षेसाठी त्याने दोन विदेशी जातीचे अत्यंत हिंस्र श्वान पाळले होते. या कुत्र्यांच्या भीतीने सामान्य नागरिक या बंगल्याच्या आसपास जाण्याचेही धाडस करत नसत. एकीकडे अध्यात्माचा बुरखा आणि दुसरीकडे हिंस्र श्वानांच्या जोरावर निर्माण केलेली दहशत, अशा दुहेरी विळख्यात खरातने आपले गुन्हेगारी साम्राज्य चालवले होते. एसआयटी आता या महालाच्या गर्भात दडलेली आणखी किती काळी रहस्ये बाहेर काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




