Ashok Kharat Case : महाराष्ट्राच्या राजकारणाला अघोरी विद्येचे ग्रहण? ३९ आमदारांच्या ‘रक्त-अभिषेका’च्या चर्चेने खळबळ!

spot_img

भोंदूगिरी, लैंगिक शोषण, कोट्यवधींची माया आणि या सगळ्यात गुरफटलेले राज्याचे बडे लोकप्रतिनिधी! हे सगळं करणाऱ्याचं नाव आहे – अशोक खरात (Ashok Kharat). पण हे प्रकरण केवळ एका बाबाच्या भोंदूगिरीपुरतं मर्यादित नाही. या प्रकरणाची व्याप्ती इतकी मोठी आहे की, राज्याच्या 39 आमदारांनी एका बाबाच्या सांगण्यावरून स्वतःची बोटं कापून रक्ताचा अभिषेक घातल्याची चर्चा सध्या रंगतेय. कुणी आपली अनामिका कापली, तर कुणी करंगळी! हे आमदार कोण आहेत? त्यांनी हे का केलं? एखादं सरकार पाडण्यासाठी हा अघोरी प्रकार झाला का? आणि या सगळ्या गुपितांची चावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच का आहे?

अशोक खरात… हे नाव काही महिन्यांपूर्वी फारसं कुणाला माहित नव्हतं. पण अचानक या माणसाचे कारनामे समोर आले आणि लोक थक्क झाले. अध्यात्माच्या नावाखाली खरातने लोकांची फसवणूक करून कोट्यवधींची मालमत्ता जमवली. शेकडो महिलांच्या लैंगिक शोषण त्याने केले असल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. तो केवळ एक भोंदूबाबा नाही, तर तो एक गुन्हेगार प्रवृत्तीचा विकृत माणूस आहे. खरातची पोहोच इतकी मोठी होती की, मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या त्याच्या एका शब्दावर व्हायच्या. राजकारण आणि प्रशासनात त्याची पकड मजबूत होती.

खरातची राजकीय ताकद किती होती, याचा अंदाज यावरून येतो की राज्याचे आमदार आणि मंत्री त्याच्या दरबारात हजेरी लावायचे. रूपाली चाकणकरसारख्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्या खरातचे पाय धुवण्यात धन्यता मानायच्या. राज्याच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या अनामिकांना झालेल्या जखमांची छायाचित्रे व्हायरल झाली. जेव्हा पत्रकारांनी विचारलं, तेव्हा दोघांनीही ‘गाडीच्या दरवाजात बोट अडकलं’ असं सारखं उत्तर दिलं. पण तर्क-वितर्क वेगळेच होते. ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी महिलांच्या शोषणाविरोधात लढायला हवं, त्या अशा भोंदू बाबाच्या पायाशी का होत्या? हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय.

प्रकरणाला सर्वात मोठं वळण मिळालं जेव्हा शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी एक खळबळजनक विधान केलं. ते म्हणाले, “मी एकटाच तिथे जात नव्हतो, तर राज्यातील 39 आमदार खरातच्या पायावर डोकं टेकवून आले आहेत.” यानंतर शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी थेट आरोप केला की, या 49 आमदारांनी केवळ दर्शन घेतलं नाही, तर स्वतःची बोटं कापून रक्ताने पूजा केली आहे. यामुळे आता काही प्रश्न पडतात, ही पूजा कुणासाठी होती? एखादं सरकार पाडण्यासाठी हा अघोरी विधी करण्यात आला का? तत्कालीन महाविकास आघाडीचं सरकार किंवा देवेंद्र फडणवीस यांना सत्तेतून हटवण्यासाठी किंवा अडथळे निर्माण करण्यासाठी हे केलं गेलं का?

या संपूर्ण प्रकरणात सर्वात महत्त्वाची भूमिका आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची. फडणवीसांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट सांगितलं की, “विरोधातले कोण-कोणते आमदार खरातकडे गेले आणि त्यांचे त्याच्याशी काय संबंध होते, याची सर्वात जास्त माहिती माझ्याकडे आहे.” इथे काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात. जर फडणवीस यांना ही 39 नावे माहित आहेत, तर ती जनतेसमोर का येत नाहीत?.राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, हे 39 आमदार सत्ताधारी पक्षातीलही असू शकतात. मग काय स्वतःच्याच आमदारांना ‘मांडलिक’ बनवण्यासाठी किंवा त्यांना आपल्या कह्यात ठेवण्यासाठी फडणवीस या माहितीचा वापर ‘ट्रम्प कार्ड’ म्हणून करत आहेत का? गृहमंत्री म्हणून फडणवीसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी का लावली नाही? केवळ माहिती आहे असं सांगून ते कुणाला वाचवत आहेत?

ज्या राज्याला शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा आहे, ज्या राज्यात जादूटोणा विरोधी कायदा आहे, ज्या राज्याला पुरोगामि राज्य म्हणून ओळखलं जातं, त्या राज्यात जनता ज्यांना निवडून देते, ते लोकप्रतिनिधी एका भोंदू बाबाच्या सांगण्यावरून स्वतःचं रक्त सांडत आहेत? जर हे आमदार अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन बोटं कापून विधी करत असतील, तर ते राज्याचा विकास काय करणार? हा निव्वळ अघोरी प्रकार नसून लोकशाहीला लागलेली कीड आहे. अशोक खरात सध्या तुरुंगात आहे, पण त्याने पेरलेली ही राजकीय विषवल्ली अजूनही बाहेर आहे. जर त्या 39 आमदारांनी खरोखर अशी अघोरी पूजा केली असेल, तर जनतेला हे जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे की, ते 39 आमदार कोण आहेत ज्यांनी बोटं कापली. ही अघोरी विधी काय महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी होती? की फडणवीसांना बाजूला सारण्यासाठी? की स्वतःचं मंत्रिपद टिकवण्यासाठी? हे तेव्हाच स्पष्ट होईल जेव्हा त्यांची नावं समोर येतील.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ