अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचे होत असून तपासादरम्यान नवनवीन माहिती समोर येत आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, आतापर्यंतच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीत अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पुढील कोठडी आवश्यक आहे.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान एका पीडित महिलेनं धैर्याने पुढे येत आपली बाजू मांडली. यावेळी आरोपी अशोक खरात याला काही सांगायचे आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला असता त्याने हात जोडत “मला काही बोलायचे नाही” असे उत्तर दिले.
तपास यंत्रणा आणि सरकारी पक्षाने युक्तिवाद करताना या प्रकरणात केवळ आर्थिक फसवणूकच नव्हे, तर लैंगिक अत्याचार आणि काही विकृत कृत्यांचेही गंभीर आरोप असल्याचे स्पष्ट केले. आरोपीच्या वकिलांनीही बाजू मांडली असून, एसआयटीने पुढील तपासासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे.
दरम्यान, तपास यंत्रणेकडून विशेषतः पीडित महिलांशी संबंधित आरोपांची चौकशी प्राधान्याने केली जात आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




