महापालिका प्रचारात AIMIM प्रमुखांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात, द्वेषाच्या राजकारणावर टीका
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार शिगेला पोहोचला असून, राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांनी वातावरण तापू लागले आहे. याच प्रचारादरम्यान AIMIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी सोलापुरात केलेले वक्तव्य मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे. “एक दिवस असा नक्की येईल की हिजाब परिधान करणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल,” असे ठाम विधान ओवैसी यांनी केले.
भारत आणि पाकिस्तानच्या संविधानाची तुलना करताना ओवैसी म्हणाले की, पाकिस्तानच्या संविधानात एका विशिष्ट समाजातील व्यक्तीलाच सर्वोच्च पदावर बसण्याची अट आहे. मात्र, भारतीय संविधान सर्व समाजांना समान संधी देते. “आज आपण कदाचित ते पाहणार नाही, पण भविष्यात भारतात हिजाब घालणारी मुलगी पंतप्रधान होईल, हीच आपल्या संविधानाची ताकद आहे,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी ओवैसी यांनी मुस्लिम समाजाविरोधात पसरवण्यात येणाऱ्या द्वेषावरही जोरदार प्रहार केला. “द्वेषाचं राजकारण कायम टिकत नाही. द्वेष पसरवणारे शेवटी नामशेष होतात,” असे म्हणत त्यांनी महागाईचा मुद्दाही उपस्थित केला. “आज सोलापुरात पेट्रोलचा दर 104 रुपये आहे. पण पेट्रोलच्या किमतीवर प्रश्न विचारला, तर त्या व्यक्तीला बांग्लादेशी ठरवलं जातं,” असा टोला त्यांनी लगावला.
सोलापुरातील स्थानिक प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करत ओवैसी म्हणाले की, शहरात अनेक गंभीर समस्या असताना सरकार त्याकडे डोळेझाक करत आहे. “भाजप, शिंदे गट आणि अजित पवार हे तिघे मिळून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत आहेत. 15 तारखेला मतदानातून त्यांना स्पष्ट संदेश द्या, त्यांच्या कारस्थानांना बळी पडू नका,” असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
महायुतीवर थेट टीका करत ओवैसी म्हणाले की, “फडणवीस, शिंदे आणि पवार हे संविधानाच्या चौकटीत राजकारण करत नाहीत. ते द्वेषाच्या जोरावर सत्तेचा वापर करत आहेत. हे अल्पसंख्यांक, दलित किंवा शेतकऱ्यांचे हितचिंतक नाहीत. दलितांना त्यांचे हक्क नाकारले जात आहेत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.” ओवैसी यांच्या या आक्रमक भाषणामुळे सोलापुरातील महापालिका निवडणूक प्रचाराला आणखी धार चढल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.




