spot_img

Arun Tupe Death : छत्रपती संभाजीनगरच्या लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेचा अचानक मृत्यू; सोशल मीडियावर शोककळा

spot_img

मृत्यूपूर्वी काही तासांपूर्वीच शेअर केली होती रील; नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार.

छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अरुण तुपे यांच्या अचानक मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या अरुणचा 10 मार्च रोजी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी काही तास आधीच त्याने सोशल मीडियावर एक रील पोस्ट केली होती. त्यामुळे त्याच्या अचानक झालेल्या निधनाने चाहत्यांसह शहरभर हळहळ व्यक्त केली जात आहे.

अरुण तुपे याचे सकाळी एका कॅफेसाठी प्रमोशनल शूट ठरले होते. त्यासाठी सकाळी साडेदहा वाजता सिनेमॅटोग्राफरने त्याला फोन केला. मात्र फोन अरुणच्या मित्राने उचलत धक्कादायक बातमी दिली. “अरुण आता कधीच येऊ शकणार नाही,” असे त्याने सांगितले. सुरुवातीला हा विनोद वाटला, पण काही क्षणांतच अरुणच्या निधनाची बातमी खरी असल्याचे स्पष्ट झाले.

अरुण हा कष्टकरी कुटुंबातून पुढे आलेला तरुण होता. शेजारी राहणाऱ्या सुलभा पाटील यांनी तो अत्यंत गुणी आणि नम्र मुलगा असल्याचे सांगितले. तर त्याचा बालमित्र ऋतुराज आरटच्या मते, अरुण खूप मनमिळाऊ होता आणि त्याने कधीही कोणाचे मन दुखावले नाही. कंटेंट क्रिएटर म्हणून नाव कमावूनही तो जमिनीवरच राहिला आणि नव्या कंटेंट क्रिएटर्सना मार्गदर्शन करत असे.

मृत्यूपूर्वी २४ तासांपूर्वीच अरुणने आकाशवाणी परिसरात एका व्हायरल गाण्यावर रील शूट करून ती सोशल मीडियावर शेअर केली होती. दरम्यान, सोमवारी रात्री सिनेमॅटोग्राफरसोबत त्याचे शूटबाबत बोलणे झाले होते आणि मंगळवारी सकाळी १० वाजता शूट ठरले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुण सकाळी साधारण सहा वाजता उठला होता. मात्र “थोडावेळ पुन्हा झोपतो” असे सांगून तो पुन्हा झोपला. काही वेळाने आईने उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रतिसाद देत नव्हता. कुटुंबीयांनी त्याला तातडीने क्लिनिकमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत त्याला घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. अरुणची आई शिवणकाम करते, तर वडील साऊंड सिस्टमचा व्यवसाय करतात.

या प्रकरणात पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदन दरम्यान व्हिसेरा तपासणीसाठी जतन करण्यात आला आहे. प्राथमिक अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसून, अंतिम अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूमागील नेमके कारण समोर येणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ