भावाच्या अटकेनंतर चौकशी आयोगाचा नवा दावा, देशात परतताच अर्जुनवर कारवाईची शक्यता
1996 च्या विश्वचषक विजेत्या श्रीलंका संघाचा कर्णधार अर्जुन रणतुंगा (Arjuna Ranatunga) सध्या गंभीर अडचणीत सापडला आहे. एकेकाळी श्रीलंका सरकारमध्ये पेट्रोलियम उद्योगमंत्री राहिलेल्या रणतुंगावर आता भ्रष्टाचारप्रकरणी अटकेची टांगती तलवार आहे. सीलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील कथित घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात त्याचं नाव दुसरा आरोपी म्हणून पुढे आलं आहे.
या प्रकरणात अर्जुनचा मोठा भाऊ दम्मिका रणतुंगा याला दोषी ठरवण्यात आलं आहे. दम्मिका हे 2017 साली सीलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष होते. कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, त्यामुळे श्रीलंका (Shri Lanka) सरकारला सुमारे 80 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा भ्रष्टाचार चौकशी आयोगाने केला आहे. 15 डिसेंबर रोजी दम्मिका यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं होतं, मात्र नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली.
सध्या दम्मिका रणतुंगा यांना देशाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली असून, कोर्टाच्या परवानगीशिवाय ते श्रीलंका सोडू शकत नाहीत. त्यांच्याकडे श्रीलंका आणि अमेरिका अशा दोन्ही देशांचं नागरिकत्व आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 13 मार्च 2026 रोजी होणार आहे.
दरम्यान, भ्रष्टाचार चौकशी आयोगाने कोलंबो न्यायालयात अर्जुन रणतुंगा हा या घोटाळ्यातील दुसरा आरोपी असल्याचं नमूद केलं आहे. अर्जुन सध्या देशाबाहेर असून, तो श्रीलंकेत परतल्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. अर्जुन आणि त्याच्या भावांविरोधात आता नव्याने सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
2024 मध्ये अनुरा कुमारा दिसानायके यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नव्या सरकारने भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेण्याचं आश्वासन दिलं आहे. याआधीही रणतुंगा कुटुंबातील आणखी एक भाऊ, माजी पर्यटन मंत्री प्रसन्न रणतुंगा, विमा घोटाळा प्रकरणात अडचणीत आला होता. 2022 मध्ये त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.
62 वर्षीय अर्जुन रणतुंगा हा श्रीलंका क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने 1996 मध्ये विश्वचषक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली होती. रणतुंगाने श्रीलंकेसाठी 93 कसोटी आणि 293 एकदिवशीय सामने खेळून 10 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. क्रिकेटमधील त्याची कामगिरी अजरामर असली, तरी आता राजकीय कारकीर्दीवर भ्रष्टाचाराच्या आरोपांची सावली गडद होताना दिसत आहे.




