भारतीय क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा, अर्जुन तेंडुलकर, सध्या आयपीएल २०२६ च्या पार्श्वभूमीवर कमालीचा चर्चेत आला आहे. तब्बल चार वर्षे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात राहूनही पुरेशी संधी न मिळाल्याने अर्जुनने अखेर हा संघ सोडला आणि आता तो लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या मोठ्या बदलानंतर अर्जुनने प्रथमच आपले मौन सोडले असून, मुंबई इंडियन्समध्ये मिळालेल्या वागणुकीवर आणि सतत ‘बेंच’वर बसून राहण्यावर त्याने स्पष्टपणे भाष्य केले आहे.
२०२१ पासून २०२५ पर्यंत मुंबई इंडियन्सचा भाग असलेल्या अर्जुनला इतक्या प्रदीर्घ काळात केवळ ५ सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्याने ३ बळी टिपले आणि आपली स्विंग गोलंदाजी सिद्ध केली, परंतु संघ व्यवस्थापनाने त्याच्यावर पुन्हा कधीच विश्वास दाखवला नाही. यावर बोलताना अर्जुन म्हणाला, “कोणालाही मैदानाबाहेर बेंचवर बसून राहायला आवडत नाही. पण एक खेळाडू म्हणून आपण सतत मेहनत करत राहणे महत्त्वाचे असते, जेणेकरून संधी मिळेल तेव्हा त्याचे सोनं करता येईल.” अर्जुनच्या या विधानावरून इतकी वर्षे संधी न मिळाल्याची खंत स्पष्टपणे जाणवत आहे.
आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी अर्जुन तेंडुलकरला लखनऊ सुपर जायंट्सने ३० लाख रुपयांना ट्रेड करून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. मुंबई इंडियन्सने त्याला बाहेरचा रस्ता दाखवल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला असला, तरी अर्जुनसाठी ही एक नवी संधी मानली जात आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या अर्जुनला आता लखनऊच्या जर्सीत मैदानात प्रत्यक्ष कामगिरी करण्याची संधी मिळते का, आणि तो आपल्या टीकाकारांना काय उत्तर देतो, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.




