डीवाय पाटील टी-20 ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत संघासाठी खेळला.
खेळाडू आपल्या खेळाबद्दल किती समर्पित असतात, याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. अशाच प्रकारची जिद्द महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने दाखवून दिली. लग्नानंतर अवघ्या एका दिवसातच त्याने आपल्या संघासाठी मैदानात उतरून सर्वांचे लक्ष वेधले.
अर्जुन तेंडुलकरने 5 मार्च रोजी मुंबईत सानिया चंडोकसोबत विवाह केला. या लग्नसमारंभाला क्रिकेट क्षेत्रातील अनेक दिग्गज तसेच उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लग्नाचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आणि त्याची चांगलीच चर्चा रंगली. मात्र लग्नानंतर केवळ 24 तासांतच अर्जुन पुन्हा क्रिकेटच्या मैदानात दिसल्यामुळे त्याच्या खेळावरील प्रेमाची चर्चा सुरू झाली.
अर्जुन सध्या डीवाय पाटील टी-20 ट्रॉफी या स्पर्धेत डीवाय पाटील ब्लू संघाकडून खेळत आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी संघाचा उपांत्य फेरीचा सामना असल्याने त्याने विश्रांती न घेता संघासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यात डीवाय पाटील ब्लूचा सामना मुंबई कस्टम्स संघाशी झाला. प्रथम फलंदाजी करताना ब्लू संघाने 20 षटकांत 156 धावा केल्या. मात्र संघातील युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी यावेळी प्रभावी कामगिरी करू शकला नाही आणि तीन चेंडूत शून्यावर बाद झाला. अर्जुन तेंडुलकरलाही केवळ 9 धावा करता आल्या. संघाकडून कर्णधार शशनक सिंह याने 24 चेंडूत 42 धावांची सर्वोत्तम खेळी केली.
यानंतर 156 धावांचे लक्ष्य गाठताना मुंबई कस्टम्सच्या फलंदाजांनी आक्रमक खेळ करत अवघ्या 16 षटकांतच सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. गोलंदाजीमध्येही अर्जुनचा दिवस खास ठरला नाही. त्याने टाकलेल्या एका षटकात तब्बल 20 धावा दिल्या.




