spot_img

AR Rahman Birthday : हिंदू दिलीप कुमार ते ए.आर. रेहमान, श्रद्धा, संगीत आणि आयुष्याला कलाटणी देणारा प्रवास

spot_img

सूफी संतांच्या भेटीने बदलले आयुष्य, धर्मांतरापासून जागतिक कीर्तीपर्यंतचा रेहमानांचा प्रेरणादायी प्रवास

गायक, संगीतकार आणि संगीतविश्वातील जादूगार म्हणून ओळखले जाणारे ए.आर. रेहमान यांना वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. त्यांच्या स्वरांनी आणि संगीताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मात्र, रेहमान केवळ त्यांच्या व्यावसायिक यशामुळेच नाही, तर त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत राहिले आहेत.

ए.आर. रेहमान यांचा जन्म 6 जानेवारी 1967 रोजी चेन्नई येथे एका हिंदू कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव दिलीप कुमार होतं. आज 59 वर्षांचे होणारे रेहमान यांच्या आयुष्यात काही अशा घटना घडल्या, ज्यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनदृष्टीला वेगळं वळण दिलं.

रेहमान यांच्या वडिलांना कर्करोग झाला होता. त्यांच्या आजारपणाच्या काळात एका सूफी संतांनी उपचार केले. या अनुभवाचा रेहमान आणि त्यांच्या कुटुंबावर खोल परिणाम झाला. काही वर्षांनंतर सूफी संतांच्या संपर्कात आल्यानंतर रेहमान आणि त्यांच्या कुटुंबाने इस्लाम धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. धर्मांतरानंतर दिलीप कुमार हे अल्लाह रक्खा रेहमान म्हणून ओळखले जाऊ लागले. विशेष म्हणजे, ‘ए.आर. रेहमान’ हे नाव त्यांना एका हिंदू ज्योतिषाकडून मिळाल्याचाही त्यांनी खुलासा केला होता.

एका मुलाखतीत रेहमान यांनी सांगितलं की, त्यांना सुरुवातीला संगीतकार व्हायचं नव्हतं. त्यांचं स्वप्न कंप्यूटर इंजिनिअर होण्याचं होतं. मात्र, नियतीने वेगळंच काही ठरवलं होतं. 1992 साली प्रदर्शित झालेल्या ‘रोजा’ चित्रपटातून त्यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आणि तेव्हापासून मागे वळून पाहिलंच नाही.

1995 मध्ये रेहमान यांचं सायरा बानूसोबत लग्न झालं. या दांपत्याला खतिजा, रहीमा आणि अमीन ही तीन अपत्ये आहेत. मात्र, लग्नाच्या तब्बल 29 वर्षांनंतर रेहमान आणि सायरा यांनी घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आणि रेहमान यांच्यावर टीकाही झाली.

श्रद्धा, संघर्ष, संगीत आणि वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार यांचा संगम म्हणजे ए.आर. रेहमान यांचा जीवनप्रवास. संगीताच्या माध्यमातून त्यांनी जगभरात भारतीय संस्कृतीचं नाव उज्वल केलं, हे नाकारता येणार नाही.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ