गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील अंजनगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला तणाव अखेर निवळला आहे. गावकरी, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या संयुक्त प्रयत्नांतून या वादावर यशस्वी तोडगा निघाला असून, सामंजस्याचा विजय झाला आहे. खेळोबा देवस्थानच्या जागेत बसवण्यात आलेला पुतळा आता शासकीय जागेत सन्मानाने स्थलांतरित करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी सामाजिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्यांना अंजनगावातील दोन्ही समाजांनी एकजुटीने चपराक लगावली आहे.
या वादावर पडदा टाकण्यासाठी माजी आमदार राजन पाटील यांनी महत्त्वाची मध्यस्थी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार झालेल्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय झाला. विशेष म्हणजे, नवीन जागेवर महाराजांच्या पुतळ्याचे भव्य सुशोभीकरण करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा नियोजन समितीमधून (DPC) १ कोटी रुपयांचा निधी तातडीने जाहीर केला आहे. “गावचा वाद मिटला आहे, त्यामुळे आता कोणत्याही बाहेरील राजकीय नेत्यांनी किंवा आंदोलकांनी गावात येऊ नये,” असे आवाहन राजन पाटील यांनी यावेळी स्पष्टपणे केले.
पुतळ्याला विरोध नसून केवळ जागेचा तांत्रिक प्रश्न असल्याचे सांगणारे पुजारी फरांडे महाराज यांनीही आपले आंदोलन मागे घेतले आहे. मध्यरात्री ३ वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीनंतर, पोलीस महानिरीक्षक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाण्याचे घोट घेऊन त्यांनी उपोषण सोडले. राज्यामध्ये सध्या महापुरुषांच्या पुतळ्यावरून अनेक ठिकाणी वाद पेटवले जात असल्याचा आरोप होत असताना, अंजनगावातील जनतेने दाखवलेला समजूतदारपणा संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे. या निर्णयामुळे केवळ गावचा वादच मिटला नाही, तर पंचक्रोशीत अंजनगावातील ग्रामस्थांच्या धैर्याचे आणि एकोप्याचे कौतुक होत आहे.




